केंद्र आणि राज्य सरकारच्या अंत्यत महत्त्वाच्या प्रकल्पापैकी एक असलेल्या ठाणे वर्तुळाकार मेट्रोच्या कामास घोडबंदर भागात सुरुवात झाली आहे. ठाणे शहरातील अंतर्गत मार्गावरील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी हा प्रकल्प तयार केला जात आहे.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरु झाले असून ठाणे शहराच्या अंतर्गत मार्गांवर भविष्यात खोदकामास सुरुवात होणार आहे. त्यामुळे त्याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. तसेच शहरातील अनेक वृक्ष, पदपथ, उद्यानांवरुनही हा प्रकल्प जाण्याची शक्यता आहे.ठाणे शहरातील घोडबंदर, जुने ठाणे, वागळे इस्टेट भागात मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे.
परंतु शहरातील अरुंद रस्त्यांमुळे कोंडी होते. तसेच वाहनांचा भारही वाढला आहे. ठाणे शहरात सध्या मेट्रो चार (वडाळा-घाटकोपर-कासारवडवली), मेट्रो चार-अ (कासारवडवली ते गायमुख) आणि कापूरबावडी ते बाळकुम भागात मेट्रो पाच ( ठाणे- भिवंडी ते कल्याण) या मेट्रोची कामे सुरु आहेत. सध्या एखाद्या प्रवाशाला ठाणे रेल्वे स्थानक गाठायचे असल्यास अंतर्गत मार्गाशिवाय पर्याय नाही.ठाणे शहरातील परिवहन सेवा लोकसंख्येच्या तुलनेत पुरशी नाही. बहुतांश ठाणेकर ठाणे रेल्वे स्थानक गाठण्यासाठी रिक्षा किंवा खासगी वाहनांचा वापर करतात. अंतर्गत मार्गावर वाहतुक कोंडी होते.
ही वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी ठाणे शहरात वर्तुळाकार मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, महाराष्ट्र मेट्रो रेल काॅर्पोरेशन लिमिटेडच्या (महा मेट्रो) मदतीने १२ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प उभारला जाणार आहे. हा २९ किमी लांबीचा कॉरिडॉर ठाणे शहराच्या पश्चिम भागाच्या परिघावरून जाणार असून त्यात एकूण २२ स्थानके असतील.वाहतूक पर्यायाअभावी मरणधोकाकाही दिवसांपूर्वीच या मेट्रो निर्माणासाठी तीन हजार वृक्षांची तोड करण्यास ठाणे महापालिकेने परवानगी दिली होती.
त्यानंतर पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली गेली होती. या प्रकल्पाच्या निर्माण कामासही आता सुरुवात झाली आहे. ब्रम्हांड परिसरात ही कामे सुरु आहेत. येथील एका बगीचाजवळ मेट्रो निर्माणासाठीचे अडथळे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे बगाचीमधील प्रवेश देखील जवळपास बंद झाला आहे.
ठाणे शहरातील अंतर्गत मार्गांवर आता महा मेट्रोद्वारे टप्प्या-टप्प्याने अडथळे बसविले जाणार आहेत. त्यामुळे प्रकल्पासाठी खोदकामास सुरुवात झाल्यानंतर अंतर्गत मार्गावर मोठ्याप्रमाणात कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. अरुंद रस्त्यामुळे ठाणेकर कोंडीच्या विळख्यात अडकण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पात एकूण २२ मेट्रो स्थानके आहेत. यामध्ये रायला देवी, वागळे चौक, लोकमान्य नगर बसगाडी आगार, छ. शिवाजी महाराज नगर, नीळकंठ टर्मिनल, गांधीनगर, डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजयनगरी, वाघबीळ, खाडी किनारी मार्ग, पातलीपाडा, आझादनगर बसगाडी आगार, मनोरमानगर, कोलशेत, बाळकुम नाका, बाळकुम पाडा, राबोडी, छ. शिवाजी महाराज चौक, ठाणे जंक्शन आणि नवीन ठाणे स्थानक ही स्थानके असतील.












