अमरावतीच्या परतवाडा शहरात लैंगिक अत्याचाराचं एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. येथील एका १९ वर्षीय तरुणाने अनेक तरुणींचं लैंगिक शोषण केलं आहे. आरोपीनं पीडित तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केला आहे.
आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने पीडितांचे लैंगिक अत्याचार करत असतानाचे काही फोटो आणि अश्लील व्हिडीओ काढले आहेत. हेच व्हिडीओ व्हायरल करत त्याने वारंवार पीडितांना ब्लॅकमेल केल्याचा देखील आरोप आहे. आता या प्रकरणातील एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
मुख्य आरोपी अहमद अयान हा पीडित तरुणींचं लैंगिक शोषण कसं करायचा? त्यांचे अश्लील व्हिडीओ कसे शूट व्हायचे याची माहिती आता पोलीस तपासात समोर आली आहे. आरोपी अयान हा अमरावतीच्या कठोरा नाका परिसरात एका फ्लॅटवर युवतींचं लैंगिक शोषण करायचा आणि त्याचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचा अशी माहिती आता समोर आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी अयान याचा एक मित्र अमरावतीच्या कठोरा नाका परिसरातील एका रेसिडेन्सीमध्ये तिसऱ्या मजल्यावर राहतो. याच ठिकाणी अयान तरुणींना घेऊन येत होता. इथे तरुणींवर अत्याचार करून तो त्यांचे अश्लील व्हिडीओ शूट करायचा. या कामासाठी तो त्याच्या मित्राला पाचशे रुपये द्यायचा.बुधवारी सायंकाळी याच फ्लॅटवरून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. या फ्लॅटमध्ये अनेकदा मुलींना आणलं जात असल्याची धक्कादायक माहितीही आता समोर आली आहे.
बुधवारी पोलिसांनी या फ्लॅटवर येऊन चौकशी केली आहे. इथं इतरही अनेक तरुणींना आणलं होतं का? याचा सविस्तर तपास आता पोलीस करत आहेत.या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण सहा आरोपींना अटक केली आहे. तर इतर चार जणांची कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी आरोपींचे पाच मोबाईल फोन जप्त केले आहेत. यामधून पोलिसांना ८ तरुणींचे एकूण १८ व्हिडीओ आणि ३९ फोटो आढळले आहेत.












