पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने चिखली येथील आदित्य लॉजवर छापा टाकून एका मोठ्या देहविक्रय व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे.
या कारवाईत ९ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यात एका बांगलादेशी तरुणीचा समावेश आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार, चिखली येथील देहू-आळंदी रोडवरील आदित्य लॉजवर ही धाड टाकण्यात आली.
या ठिकाणी लॉजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सुटका करण्यात आलेल्या ९ महिलांपैकी एका तरुणीला आरोपींनी बांगलादेशातून तस्करी करून आणले होते. तिला पुन्हा मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी लॉज मॅनेजर अशोक बाबुराव बाबर आणि कामगार अकिबुल खालेक मुल्ला या दोघांना अटक केली आहे. तसेच लॉज चालक सुदर्शन पवार, जागा मालक नाना बोराटे आणि साहिल ऊर्फ शाहीन मंडल यांच्याविरुद्ध चिखली पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता आणि पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.












