काही वर्षांपूर्वीपर्यंत कॉस्ट अकाउंटंट्सचे कार्य केवळ कंपन्यांचे आर्थिक ऑडिट आणि फायनान्शियल अकाउंटिंगपुरते मर्यादित होते. त्यामुळे हे क्षेत्र प्रामुख्याने कंपन्यांच्या ‘बॅक ऑफिस’ स्वरूपात पाहिले जात होते. मात्र बदलत्या काळात दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICMAI) मुळे या क्षेत्राचा व्याप, महत्त्व आणि जबाबदाऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असून आज कॉस्ट अकाउंटंट्स हे उद्योगांच्या निर्णयप्रक्रियेतील महत्त्वाचे भागीदार बनले आहेत. देशातील आर्थिक सक्षमीकरणात ICMAI चे मोठे योगदान असून ‘विकसित भारत’ घडवण्यात संस्थेचा निर्णायक वाटा असेल, असे प्रतिपादन रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे अध्यक्ष व चीफ फायनान्शियल ऑफिसर रजनीश जैन यांनी केले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICMAI) यांच्या वतीने पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या “RISE इंडिया लीडरशिप समिट” च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी ICMAI चे करिअर काऊन्सेलिंग अँड प्लेसमेंट कमिटीचे अध्यक्ष CMA विनय रंजन, ICMAI चे उपाध्यक्ष नीरज जोशी, माजी अध्यक्ष बी.बी. नायक, CMA चैतन्य मोहरीर (सचिव – ICMAI-WIRC), CMA श्रीकांत इप्पलपल्ली (अध्यक्ष – ICMAI पुणे चॅप्टर) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रजनीश जैन पुढे म्हणाले की, ICMAI चे स्वरूप, कार्य आणि जबाबदाऱ्या काळानुसार सातत्याने बदलत आहेत. आज कॉस्ट अकाउंटंट्स केवळ आकडे मांडणारे व्यावसायिक न राहता, कंपन्यांच्या धोरणात्मक निर्णयप्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत आहेत. उद्योग आणि ICMAI यांनी परस्पर सहकार्याने काम केल्यास केवळ कंपन्यांचाच नव्हे, तर देशाच्या आर्थिक विकासालाही अधिक गती मिळू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ICMAI मुळे देशातील लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून देशाच्या आर्थिक उलाढालीत सुमारे ५० हजार कोटी रुपयांपर्यंतचे योगदान शक्य झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
ICMAI पुणे चॅप्टरचे अध्यक्ष CMA श्रीकांत इप्पलपल्ली म्हणाले की, तंत्रज्ञानासोबतच कंपन्या आणि व्यावसायिकांच्या गरजा झपाट्याने बदलत आहेत. आज देशात कॉस्ट अकाउंटंट्सची कमतरता जाणवत असून उद्योगांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारच्या परिषदांची मोठी गरज आहे. या परिषदांमधून व्यावसायिकांना नव्या संधी आणि बदलत्या अपेक्षा समजण्यास मदत होते.
करिअर काऊन्सेलिंग अँड प्लेसमेंट कमिटीचे अध्यक्ष CMA विनय रंजन यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी भारताची ओळख पाश्चिमात्य कंपन्यांसाठी बॅक ऑफिस सेवा पुरवणारा देश अशी होती. मात्र आता ही प्रतिमा बदलत असून ICMAI आणि कॉस्ट अकाउंटंट्सचा देशाच्या आर्थिक उलाढालीत सुमारे दोन टक्के वाटा निर्माण झाला आहे. ICMAI मुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत असून २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टात संस्थेचा मोलाचा वाटा असेल. देशाची अर्थव्यवस्था ३० ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ICMAI चे माजी अध्यक्ष बी.बी. नायक म्हणाले की, ICMAI चा मुख्य उद्देश केवळ व्यवसायवृद्धी करणे नसून कंपन्या आणि व्यावसायिकांमध्ये गुणात्मक बदल घडवणे हा आहे. रिलायन्स जिओमध्ये रजनीश जैन यांनी घडवलेले सकारात्मक बदल हे तरुणांनी आणि कॉस्ट अकाउंटंट्सनी आदर्श म्हणून घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.
ICMAI चे उपाध्यक्ष नीरज जोशी यांनी सांगितले की, बदलत्या काळानुसार अभ्यासक्रमात सातत्याने सुधारणा करण्यात येत असून गुणवत्तापूर्ण कॉस्ट अकाउंटंट्स घडवणे ही काळाची गरज आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात तरुणांसमोरील आव्हाने लक्षात घेऊन ICMAI नव्या अभ्यासक्रमांची आखणी करत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिया चौधरी यांनी केले. CMA श्रीकांत इप्पलपल्ली यांनी प्रास्ताविक केले, तर CMA चैतन्य मोहरीर यांनी आभार मानले. उद्घाटनानंतर झालेल्या कॉस्ट अकाउंटिंग विषयक चर्चासत्रात “ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCCs) मधील धोरणात्मक नेतृत्व : मूल्यनिर्मितीचे शिल्पकार म्हणून CMAs” या विषयावर सखोल चर्चा झाली.
या चर्चासत्रात चित्तरंजन चट्टोपाध्याय, राजेश शुक्ला, राजा मुखर्जी, संजय भार्गवे, हिमांशु दवे, अरिंदम दत्ता, एस.के. गुप्ता, पूजा शेळके, रजनीश पांडे, डी. व्ही. जोशी, अजय महाजन, दिनेश कुमार वर्मा, हितेश माहेश्वरी, अवधूत उपाध्ये, मिलिंद जोगळेकर, अमित आपटे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.या परिषदेमुळे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्सची बदलती भूमिका तसेच कॉस्ट व मॅनेजमेंट अकाउंटंट्स (CMAs) यांचे वाढते धोरणात्मक योगदान अधोरेखित झाले. परिषदेत विविध आघाडीच्या GCC कंपन्यांचे प्रतिनिधी, CFOs आणि HR प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.












