व्याहळी कॉलनी ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती यावर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. व्याहळी कॉलनीतील शिवप्रेमी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या जल्लोषात या उत्सवात सहभागी झाले होते. परंपरेनुसार शिवजयंती साजरी करण्याची या गावाची जुनी परंपरा असून, ग्रामस्थ ती जपताना दिसून आले. लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच नागरिकांनी या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यावर्षी विशेष उपक्रम म्हणून ग्रामस्थांनी शनिवार रात्री ऐतिहासिक प्रतापगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले आणि त्यानंतर पवित्र ज्योत आणण्याचा संकल्प पूर्ण केला. किल्ल्यावर भेट दिल्यानंतर लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांनीच शिवरायांच्या विचारांचा आदर्श मनामध्ये साठवला आणि त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या प्रतापगडावरून आणलेली ही ज्योत मोठ्या श्रद्धेने आणि सन्मानाने व्याहळी कॉलनीत आणण्यात आली. ही ज्योत काळभैरवनाथ मंदिर येथे विधिवत स्थापित करण्यात आली.
गावातील माता-भगिनींनी पारंपरिक वेशभूषेत या ज्योतीचे स्वागत केले. औक्षण, फुलांची आरास आणि पारंपरिक पूजा विधींनी वातावरण अधिकच भक्तिमय झाले. तसेच ही ज्योत गावातील प्रत्येक घरासमोर नेण्यात आली. सर्व ग्रामस्थांनी या ज्योतीचे भक्तिभावाने पूजन केले. या उपक्रमामुळे संपूर्ण गावात एकात्मतेचे आणि श्रद्धेचे वातावरण निर्माण झाले.
गावातील युवकांनीही उत्सवाच्या नियोजनात पुढाकार घेतला.संपूर्ण परिसर भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणाने भारावून गेला होता. “छत्रपती शिवाजी महाराज की जय” या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले. शिवजयंतीच्या निमित्ताने समाजात एकात्मता, शौर्य आणि स्वाभिमानाची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.











