वाई प्रतिनिधी
अभेपुरी (ता. वाई) : पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर वाई पंचायत समितीच्या अभेपुरी गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा झंजावात पाहायला मिळत असून प्रचाराचा शुभारंभ उत्साहात झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभेपुरी गणाचे अधिकृत उमेदवार तथा वाई पंचायत समितीचे माजी उपसभापती पैलवान विक्रांत भैय्या डोंगरे आणि यशवंतनगर जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. बापूसाहेब शिंदे यांच्या प्रचार दौऱ्याला ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या प्रचार शुभारंभप्रसंगी भागातील ज्येष्ठ नेते, युवक नेते, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी ज्येष्ठ नागरिकांनी उमेदवारांना शुभेच्छा व आशीर्वाद देत त्यांच्या कार्यावर विश्वास व्यक्त केला. प्रचारादरम्यान “आम्ही कटिबद्ध आहोत” या संकल्पनेतून सर्वसामान्य नागरिकांसाठी सुसज्ज दवाखाने, दर्जेदार आरोग्य सुविधा, मूलभूत सोयीसुविधा तसेच सर्वांगीण विकासाचा निर्धार मांडण्यात आला. उमेदवारांनी गावोगावी भेटी देत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.

यावेळी पैलवान विक्रांत भैय्या डोंगरे यांनी सांगितले की, “अभेपुरी गणाचा सर्वांगीण विकास, आरोग्य सुविधा अधिक सक्षम करणे आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य देणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. मागील अनेक वर्षांपासून नामदार मकरंद आबा पाटील व राज्यसभा खासदार नितीन काका पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात विविध विकासकामे झाली असून या विकासकामांना कधीही खंड पडू दिला जाणार नाही. यापुढील काळात रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामविकासाच्या सर्व कामांना गती दिली जाईल. प्रत्येक गावाच्या गरजेनुसार विकास आराखडा तयार करून निधी वेळेत उपलब्ध करून देण्याचा आमचा ठाम निर्धार आहे.” तर श्री. बापूसाहेब शिंदे यांनी, “जनतेच्या विश्वासाला पात्र ठरून विकासाभिमुख कार्य करण्याचा संकल्प आहे,” असे नमूद केले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आगामी काळात यशवंत नगर गटातील विविध गावागावात विकासाचे जाळे पसरवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते विकास अण्णा शिंदे यांनी कार्यकर्ते व ग्रामस्थांना संबोधित करताना सांगितले की, “ यशवंत नगर गटाचा सर्वांगीण विकास फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी ग्रामस्थांनी खंबीरपणे उभे राहावे. ग्रामस्थांनी सुचवलेली प्रत्येक विकासकामे पूर्ण केली जातील व भागातील प्रत्येक अडचण सोडवली जाईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी आणि युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. जनतेच्या विश्वासावर चालणारे आणि विकासाला केंद्रस्थानी ठेवणारे राजकारण फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकते,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले. या प्रचार दौऱ्यामुळे अभेपुरी गणातील राजकीय वातावरण तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मिळणारा वाढता पाठिंबा लक्षवेधी ठरत आहे.











