राज्याचे उपमुख्यमंत्री आणिशिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांची साताऱ्यातील जाहीर सभा होण्यापूर्वी कार्यकर्त्यांच्या ‘भाईगिरी’ मुळे दिवसभर शहरात चर्चेचा विषय ठरला.तो म्हणजे शहरभर लावण्यात आलेले विनापरवाना शेकडो फ्लेक्स, होर्डिंग्ज आणि बॅनर्स.
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सातारा येथील ऐतिहासिक शाहूनगरीत पहिल्यांदाच जाहीर सभा होत आहे. राज्यात गाजलेल्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या घडामोडीनंतर शिवसेना नेत्यांचीही पहिलीच मोठी सभा असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला.
मात्र, या उत्साहाच्या भरात शहरात लावण्यात आलेल्या फ्लेक्स-बॅनर्ससाठी सातारा नगरपरिषदेची परवानगी घेणे आणि त्यासाठी कर भरणे आवश्यकआहे, हे कार्यकर्त्यांच्या लक्षातच आले नाही.सातारा शहरातील प्रमुख रस्ते, इमारती, चौक-चौकात मोठ्या प्रमाणावर “भाई” च्या स्वागताचे फ्लेक्स झळकत होते.
या फ्लेक्ससाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नव्हती, तसेच कोणताही करही भरलेला नव्हता. विशेष म्हणजे, अशा विनापरवाना फ्लेक्सबर सातारा नगरपरिषद सामान्यतः तातडीने कारवाई करत असते; मात्र यावेळी अतिक्रमण विभागाने या शेकडो फ्लेक्सकडे साधे लक्षही दिले नाही.
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेचे बॅनर्स काढण्याचे धाडस कोण दाखवणार, हा प्रश्नही शहरात चर्चेचा विषय ठरला होता. परिणामी, दिवसभर या विनापरवाना फ्लेक्सबाबत उलटसुलट चर्चा सुरू राहिली, तरीही हे बॅनर्स काढले नव्हतेऑनलाईन परवानगी घेणारसातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख निकम यांच्याशी संपर्क साधला असता, या फ्लेक्ससाठी कोणतीही परवानगी घेतलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले, कारवाईबाबत विचारले असता, फ्लेक्स मालकांशी चर्चा झाली असून, रविवारी ऑनलाइन पोर्टल बंद असल्याने परवानगी घेता आली नाही, असे त्यांनी सांगितले.
आज सर्व फ्लेक्सची ऑनलाइन फी भरून परवानगी घेतली जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र, ऑनलाइन पोर्टल हे मानवविरहित असल्याने ते नेहमीच सुरू असते, ही बाब दुर्लक्षित झाल्याचे दिसते. एकूणच, या प्रकरणात अतिक्रमण विभागाची अवस्था “तोंड दाबून बुक्क्यांचा मारा” अशी झाल्याचे स्पष्ट होत आहे.












