( पाचगणी प्रतिनिधी श्री.प्रशांत थोरवे )
विद्यानिकेतन हायस्कूल, पाचगणी या शाळेने मागील एकतीस वर्षांपासून इयत्ता दहावीच्या निकालातील उज्ज्वल यशस्वी परंपरा कायम राखत यंदाही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सन १९९५ मध्ये स्थापन झालेली ही शाळा आज पाचगणी परिसरातील गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी नामांकित शैक्षणिक संस्था म्हणून ओळखली जाते. निसर्गरम्य पाचगणी शहरात वसलेली ही शाळा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रसिद्ध आहे. शिस्त, संस्कार, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रम यांमुळे शाळेने पालक व विद्यार्थ्यांमध्ये विशेष विश्वास निर्माण केला आहे.
शाळेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. महेश बिरामणे, संचालिका सौ. स्वाती बिरामणे तसेच आनंदीता बिरामणे व अथर्व बिरामणे यांच्या अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि प्रभावी नियोजनामुळे शाळा सातत्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. विशेषतः संचालिका सौ. स्वाती बिरामणे या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या मानसिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक विकासावरही विशेष भर देतात. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणे, गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन करणे, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि आधुनिक शिक्षणपद्धतीचा अवलंब करणे यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांची असलेली तळमळ आणि समर्पणभाव यामुळेच पालकांमध्ये शाळेविषयी मोठा विश्वास निर्माण झाला आहे.
शाळेच्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्याची दखल घेत Asia Today Research Media संस्थेतर्फे प्रदान करण्यात येणारा मानाचा “सर्वोत्कृष्ट निवासी शाळा पुरस्कार” शाळेला प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या विशेष कार्याबद्दल शाळेला राज्यस्तरीय “विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी शाळा” हा सन्मानही प्राप्त झाला आहे.
या शाळेचे विद्यार्थी शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच विविध स्पर्धात्मक क्षेत्रांत सातत्याने आघाडीवर असल्याचे दिसून येते. गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जाणीव आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्यही शाळेमार्फत प्रभावीपणे केले जाते.
यंदाही इयत्ता दहावीच्या परीक्षेत शाळेने दरवर्षीप्रमाणे शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. एकूण निकालामध्ये शाळेचे सहा विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले असून १४ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आहे. तसेच चार विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणीत यश संपादन केले आहे.
शाळेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. महेश बिरामणे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश शिक्षकांच्या अथक परिश्रम, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे फलित आहे. शाळेतील प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मनापासून मेहनत घेत असून, विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व प्रेरणा देण्याचे कार्य सातत्याने करत आहेत. भविष्यातही विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत उत्तम संस्कार देत त्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असेही त्यांनी सांगितले.
या उल्लेखनीय यशामागे शाळेतील शिक्षकांनी घेतलेले अथक परिश्रम, विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पालकांचे सहकार्य यांचा मोठा वाटा असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलेले योग्य मार्गदर्शन, नियमित सराव, वैयक्तिक लक्ष आणि अभ्यासातील सातत्य यामुळेच विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे.
शाळेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे बिरामणे परिवाराकडून अभिनंदन करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.











