जावली तालुक्यातील दापवडी येथील दत्तात्रय कळंबे महाराज विद्यालयात उन्नती परिवार आणि शाळेच्या माजी विद्यार्थिनी यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या “सौ. सोनाली हनुमंत रांजणे” भव्य व्यासपीठाचे लोकार्पण विविध मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोयना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किसन जाधव हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उन्नती व उत्कर्ष परिवाराच्या संचालिका सौ. सोनाली रांजणे तसेच उन्नती व उत्कर्ष परिवाराचे संस्थापक-अध्यक्ष हनुमंत बळवंत रांजणे उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सचिव डी. के. जाधव, संचालक धोंडीराम जंगम, बी. व्ही. शेलार, तानाजी बाबर, व्ही. आर. उफाळे, आर. आर. जंगम, अजित आपटे, दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेचे चेअरमन रविकांत बेलोशे, दापवडीचे सरपंच महादेव रांजणे, माजी सरपंच संतोष रांजणे, मुख्याध्यापक डी. बी. आखाडे, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेच्या माजी विद्यार्थिनी सौ. सोनाली हनुमंत रांजणे यांनी स्वखर्चातून सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च करून हे व्यासपीठ उभारून दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सपत्नीक मानपत्र, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना सौ. सोनाली रांजणे म्हणाल्या, “ज्या शाळेने आपल्याला घडवले, संस्कार दिले, त्या माऊलीचे ऋण फेडण्यासाठी नव्हे तर समाजाप्रती आपली काहीतरी जबाबदारी आहे, या भावनेतून आम्ही हा छोटासा मदतीचा हात पुढे केला आहे.”
हनुमंत रांजणे यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “सोनाली रांजणे यांनी शाळेसाठी घेतलेला मदतीचा निर्णय अत्यंत स्तुत्य आहे. या व्यासपीठावरून राज्य व देशपातळीवरील वक्ते, उत्कृष्ट खेळाडू आणि गुणवंत विद्यार्थी घडावेत, हीच आमची अपेक्षा आहे. शाळेच्या विकासासाठी आम्ही यापुढेही सदैव तत्पर राहू.”
दापवडी हायस्कूलला दात्यांची कमतरता नसली तरी माजी विद्यार्थिनी म्हणून सौ. सोनाली रांजणे यांनी दिलेले हे योगदान संस्थेच्या कायम स्मरणात राहील, असे मत संस्थेचे सचिव डी. के. जाधव यांनी व्यक्त केले. तसेच शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठीच्या उपक्रमात त्यांनी यापुढेही सक्रिय सहभाग नोंदवावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी एम. जी. जाधव, पी. जे. कांबळे, डी. जी. नेवसे, वाय. बी. फरांदे, आर. एस. मापारी, एस. एच. जुनघरे, उपसरपंच सौ. नंदा रांजणे, सदाशिव रांजणे, विलास रांजणे पाटील, तानाजी रांजणे, सुशिल गोळे, भरत रांजणे, सचिन रांजणे, संतोष शिराळे, सौ. मंदाताई रांजणे, नथुभाऊ रांजणे, पोलीस पाटील सुनिता रांजणे, बबन शिंदे, सरपंच सौ. संगीता शिराळे तसेच संस्थेतील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, माता-पालक संघ, शिक्षक-पालक संघ, पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन नितीन घाडगे यांनी केले तर मुख्याध्यापक डी. व्ही. आखाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.











