पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील विसगाव खोऱ्यात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा अघोरी जादूटोण्याचा प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विसगाव खोऱ्यातील सुमारे दहा गावांमधील अनेक घरांसमोर अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री जादूटोण्याचे साहित्य ठेवले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री एका छोट्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये लिंबू, गुलाल, करडईच्या बिया आणि बिबवे यांचा समावेश असलेली पुडी बांधून ती नागरिकांच्या घरांच्या प्रवेशद्वारासमोर ठेवण्यात आली. सकाळी उठल्यानंतर घरासमोर अशा संशयास्पद पिशव्या दिसल्यानंतर नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आला.
खानापूर, बाजारवाडी, हातनोशी, बालवडी, नेरे, आंबाडे, कोळवडी यांसह आसपासच्या गावांमध्ये हा जादूटोण्याचा प्रकार आढळून आला आहे. एकाच पद्धतीने अनेक गावांमध्ये हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यादरम्यानच व्हिडिओही सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कालावधी सुरू असल्याने, नागरिकांचे मन वळवण्यासाठी किंवा वशीकरणाच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आल्याचा संशय स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र या प्रकारामागे नेमका हेतू काय, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या घटनेनंतर काही गावांमधील तरुणांनी पुढाकार घेत अंधश्रद्धेला बळी न पडता सर्व पिशव्या गोळा करून कचऱ्यात टाकून दिल्या. तर दुसरीकडे अनेक नागरिक अजूनही मानसिक दबावाखाली असून रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यास घाबरत असल्याचे चित्र आहे. अशा प्रकारच्या लिंबू डाव, जादूटोणा आणि अघोरी कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.












