{ वनविभागाच्या अधिकारी आर एफ ओ रेडे पाटील मॅडम, स्वप्निल गायकवाड व इतर.}
प्रतिनिधी : शहाजहान शेख
वाई : तालुक्याच्या पश्चिम भागात बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पसरणी घाटातील दत्त मंदिर परिसरासह विठ्ठलवाडी, कुसगाव, एकसर आणि पसरणी परिसरात बिबट्या दिसून आल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. पाळीव जनावरांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पंचायत समिती सदस्य स्वप्निल गायकवाड यांनी केली आहे.
पश्चिम भागातील नागरिक गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याच्या वावराबाबत वनविभागाशी संपर्क साधत आहेत. वनविभागाकडून गस्त घालणे आणि नागरिकांना खबरदारीच्या सूचना देणे अशा उपाययोजना केल्या जात असल्या, तरी बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अधिक ठोस कार्यवाहीची गरज असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
पसरणीपासून जोर, जांभळी परिसरापर्यंत चार ते पाच बिबटे असल्याचा अंदाज स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. या परिसरात पाळीव कुत्रे आणि शेळ्यांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अद्याप पश्चिम भागात बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्यहानी झालेली नसली, तरी सातारा तालुक्यातील न्हाळेवाडी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वेळीच खबरदारी घ्यावी. मनुष्यहानी होण्याची वाट न पाहता बिबट्यांचा वावर असलेल्या भागात आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गायकवाड यांनी केली.
बिबट्याच्या बंदोबस्तासाठी बैठक
पश्चिम भागातील बिबट्यांच्या वावरावर उपाययोजना करण्यासाठी वनविभाग आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची बैठक पंचायत समितीत झाली. या बैठकीत पंचायत समिती सदस्य स्वप्निल गायकवाड उपस्थित होते.या वेळी बिबट्यांचा वावर असलेल्या भागात आवश्यक खबरदारी घेणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याबाबत सूचना करण्यात आल्या.










