पुणे प्रतिनिधी शांताराम लांगे
सिंहगड : (१३) किल्ले सिंहगडावर शिवकाळाची परंपरा जागृत ठेवण्यासाठी आणि गडदैवतांच्या भक्तीभावातून ऐतिहासिक वारशाचे स्मरण करण्यासाठी गडदैवत श्रीअमृतेश्वर भैरव व आदिशक्ती जोगेश्वरी मातेच्या जागराचा ‘जागर शिवशक्तीचा’ हा कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला. गड किल्ले संवर्धन संस्था, महाराष्ट्र राज्य आणि सिंहगड पंचक्रोशीतील खानापूर आदि गावातील तरुण शिवभक्त यांच्या पुढाकारातून दरवर्षीप्रमाणे यंदाही घटस्थापनेच्या तिसऱ्या माळेला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शारदीय नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला मंगळवार दिनांक : 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 8 च्या सुमारास गडदेवतांचे पूजन करण्यात आले तसेच नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
या जागर कार्यक्रमात होय हिंदूच संघटनांतील शिवभक्तांसह परिसरातील स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नामघोष, भक्तिभाव आणि शिवकाळाच्या स्मरणाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. श्री.छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष तसेच श्री अमृतेश्वर भैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेच्या नामघोषाने परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमाची सांगता श्री .छत्रपती शिवाजी महाराज वंदना आणि श्री अमृतेश्वर भैरव आणि आदिशक्ती जोगेश्वरी मातेची महाआरती करून करण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करणाऱ्या सर्व शिवभक्तांचे आणि ग्रामस्थांचे आभार शिवव्याख्याते ओंकार यादव व शांताराम लांघे यांनी मानले.
शिवकाळ जागृत ठेवणे ही काळाची गरज!
श्री.छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, गड-किल्ल्यांची परंपरा गड दैवत आणि धार्मिक-सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या शिवभक्तांच्या भावनेतून हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. गड किल्ले संवर्धन संस्था, महाराष्ट्र राज्य आणि किल्ले सिंहगड पंचक्रोशीतील खानापूर गावातील तरुण शिवभक्त यांच्या वतीने आयोजित करण्यात येणारा हा ‘शिवशक्तीचा जागर’ म्हणजे शिवभक्ती, ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचा एक स्तुत्य उपक्रम आहे..










