पुणे :
पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाने मंजूषा नागपुरे यांची अधिकृत निवड केल्याने आज त्यांचा उमेदवारी अर्ज नगरसचिव योगिता भोसले यांच्याकडे दाखल करण्यात येत आहे. भाजपाकडे स्पष्ट बहुमत असल्याने महापौरपदावर भाजपचाच उमेदवार विराजमान होणार, हे जवळपास निश्चित असतानाही काँग्रेसने उमेदवार दिल्यामुळे 9 तारखेला निवडणूक होणारच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापौर व उपमहापौर पदाची निवड बिनविरोध व्हावी, यासाठी विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात आमदार चेतन तुपे पाटील, विरोधी पक्षनेते निलेश निकम, सुनील टिंगरे आणि सुभाष जगताप यांच्यात सविस्तर चर्चा सुरू होती. यावेळी निलेश निकम व चेतन तुपे पाटील यांनी आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. मात्र अंतिम निर्णय न झाल्याने निवडणूक प्रक्रिया टळली नाही.
दरम्यान, पुणे महापालिकेत भाजपाकडे तब्बल 119 नगरसेवकांचे संख्याबळ असल्याने, गणिताच्या भाषेत बोलायचे झाले तर महापौरपद भाजपाच्या हातातून जाण्याची शक्यता नाही, अशीच राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
काँग्रेसची उमेदवारी, निवडणूक अटळ
काँग्रेस पक्षाने महापौरपदासाठी अश्विनी लांडगे तर उपमहापौरपदासाठी साहिल कादरी यांचे उमेदवारी अर्ज दाखल केल्याने, बिनविरोध निवडीवर पाणी फिरले असून आता 9 तारखेला निवडणूक होणार हे स्पष्ट झाले आहे. राजकीय सौहार्दाच्या चर्चा सुरू असतानाच काँग्रेसने उमेदवार दिल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
भाजपातील अंतर्गत समीकरणे चर्चेत
महापौरपदासाठी भाजपात अनेक नावांची चर्चा होती. योगेश टिळेकर यांना आमदारकी मिळाल्यामुळे त्यांच्या मातोश्री रंजना टिळेकर यांचा विचार मागे पडल्याची माहिती आहे. तसेच आमदार व राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या भावजयी असलेल्या मानसी देशपांडे यांनाही पद न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. तर वर्षा तापकीर यांना सव्वा वर्षानंतर महापौरपद देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे भाजपातील अंतर्गत राजकारणही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
सिंहगड रोडला प्रथमच महापौरपदाचा मान
मंजूषा नागपुरे या सिंहगड रोड परिसरातून प्रथमच महापौरपदावर पोहोचणाऱ्या नगरसेविका ठरणार आहेत. त्या सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या असून, यंदाच्या निवडणुकीत त्या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. कडव्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या आणि भाजपच्या निष्ठावंत नगरसेविका म्हणून त्यांची ओळख आहे. महापालिकेच्या कामकाजाचा त्यांना सखोल अनुभव असून, स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समित्यांवर त्यांनी प्रभावी काम केले आहे.
बिनविरोध निवडीचा शब्द, पण प्रत्यक्षात वेगळीच खेळी
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार महापौर व उपमहापौर पदाची निवड बिनविरोध करण्याचे ठरले होते, अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिली होती. त्यामुळे राष्ट्रवादीकडून उमेदवार दिला जाणार नाही, असेही सांगण्यात आले होते. मात्र काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने, पुणे महापालिकेची निवडणूक ‘मैत्रीपूर्ण’ राहिली तरी मतदान अटळ झाले आहे.
पुणे महापालिकेतील पक्षीय बलाबल
भाजप : 119
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : 27
काँग्रेस : 15
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : 3
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) : 1











