बिबवेवाडी परिसरात सोमवारी (ता. २) मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला पाठीमागून दुचाकी धडकल्याने हा अपघात झाला. अक्षय अजित बोथरा (वय ३५, रा. विष्णू कॉम्प्लेक्स, सिंहगड रस्ता) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत बिबवेवाडी पोलिस ठाण्यात पोलिस अंमलदार भागीनाथ पवार यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय बोथरा हे व्यावसायिक असून सोमवारी मध्यरात्री सुमारे सव्वा दोनच्या सुमारास ते बिबवेवाडी येथून अप्पर इंदिरानगरकडे दुचाकीवरून जात होते.
ईएसआयसी रुग्णालयासमोर पोहोचताच अचानक त्यांच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला त्यांच्या दुचाकीची पाठीमागून जोरदार धडक बसली. धडकेनंतर अक्षय बोथरा रस्त्यावर कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अक्षय बोथरा यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना उपचारांपूर्वीच मृत घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण काय, टेम्पो रस्त्याच्या कडेला कोणत्या स्थितीत उभा होता, तसेच दुचाकीचा वेग किती होता, याचा तपास बिबवेवाडी पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस करत आहेत.












