खामगाव (ता. दौंड) येथे पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे झालेल्या रेबीज आजाराने एका उच्चशिक्षित युवकाला आपला जीव गमवावा लागला.खामगाव परिसरातील गाडीमोडी रहिवासी महेश राजेंद्र नागवडे (वय ३०) असे मृत युवकाचे नाव आहे.
महेश हे दहिटणे येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत लेखापाल म्हणून काम करत होता. मितभाषी, संयमी, हसतमुख महेशच्या मृत्यूने खामगाव परिसरात दुखवटा व्यक्त केला जात आहे.गुरुवारी (ता. ५) सकाळी ८.०० वाजता शोकाकुल वातावरणात खामगाव स्मशानभूमीत महेशवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी कुटुंबीय व नातेवाईकांचा आक्रोश पिळवटून टाकणारा होता. याबाबत सविस्तर माहिती अशी की, ६ नोव्हेंबर २०२५ रोजी महेश नागवडे यांना स्वतःच्या घराशेजारी पिसाळलेल्या कुत्र्याने पाठीमागून पायातील गुडघ्याच्या लवणीला चावा घेतला . त्यानंतर महेशने तातडीने उपचार घेतले होते.यवत येथील ग्रामीण रुग्णालय व ससून येथे इंजेक्शनचा कोर्स पूर्ण केला होता. सुरुवातीला प्रकृती स्थिर असल्याचे दिसत होते.
आठवड्यापूर्वी अचानक त्यांना त्रास सुरु झाला. खामगाव येथील खाजगी रुग्णालय व यवत येथील शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर रेबीजची लक्षणे जाणवल्याने खासगी डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी बाणेर येथील नायडू रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना रेबीज झाल्याचे स्पष्ट केले. उपचार सुरू असतानाच दि. ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८.०० वाजता महेश यांची प्राणज्योत मालवली.
महेश यांच्या पश्चात आई-वडील, एक विवाहित भाऊ, एक विवाहित बहीण, चुलते असा मोठा परिवार आहे. महेश हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड तालुका संघटक काळूराम नागवडे यांचे पुतणे होत.नवरदेव बनण्याच्या उंबरठ्यावर असताना महेशचा मृत्यूमहेश यांच्या लग्नाच्या हालचाली सुरू होत्या. स्थळ निश्चित झाले असून दि. ७ फेब्रुवारी रोजी लग्नाची तारीख ठरविण्याचा कार्यक्रम होणार होता. मात्र, त्याच्या आधीच काळाने झडप घातल्याने खामगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जाते.












