पंचगणी, प्रतिनिधी — प्रमोद रांजणे
पंचगणीतील प्रसिद्ध घाटजाई–काळेश्वरी देवी यात्रेनिमित्त शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी अपेक्षित असल्याने सातारा जिल्हा पोलिस प्रशासनाने वाहतूक नियंत्रणासाठी विशेष नियोजन केले आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत राहावी व भाविकांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी काही मार्गांवर तात्पुरते बदल लागू करण्यात आले आहेत. यात्रेदरम्यान पंचगणी व महाबळेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी होत असल्याने महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक वळविण्यात येणार आहे.
वाई बाजूकडून महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक एस.टी. स्टँड चौक, पाचगणी मार्गे रेल्वे प्लाझा, टेबल लँड कॉर्नर, अप्पा हॉटेल, भिलारमार्गे जुने पोलिस ठाणे ते मेन रोड मार्गे वळविण्यात येणार आहे. तसेच वाई बाजूकडून महाबळेश्वरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणून पसरणी रोड, धोम, बलकवडी, नऊरस्ता, हरदवळ मार्गे वाहतूक वळविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अवजड वाहनांसाठी सकाळी ११.०० ते रात्री ११.५९ या वेळेत विशेष वाहतूक नियोजन लागू राहणार असून, पुण्याकडून महाबळेश्वरकडे जाणारी अवजड वाहने कुसगाव–कुडल–कसहर–संजिवन नाका–पाचवड मार्गे सोडण्यात येणार आहेत. तसेच महाबळेश्वरकडून पुण्याकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठीही पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
पंचगणी पोलिस ठाण्याचे अधिकारी दिलीप पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून मंदिर परिसर, बाजारपेठ तसेच प्रमुख चौकांमध्ये पोलिस पथके नियुक्त केली जाणार आहेत. यात्रेमुळे पंचगणी शहरात उत्सवी वातावरण निर्माण झाले असून व्यापारी व स्थानिक नागरिक यात्रेच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रम व पूजा-अर्चा आयोजित करण्यात येत आहेत. पोलिस प्रशासनाने नागरिक व वाहनचालकांनी वाहतूक बदलाची माहिती घेऊन सहकार्य करावे, वाहनांची पार्किंग निर्धारित ठिकाणीच करावी तसेच संयम राखून सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.











