वाई प्रतिनिधी –प्रशांत थोरवे
व्याहळी कॉलनी गावातील सर्वांचा लाडका व समाजशील तरुण कै. अजय दिंगबर थोरवे यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त मोरया रे ग्रुप, मित्रपरिवार व व्याहळी कॉलनी ग्रामस्थांच्या वतीने भव्य मोफत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असून, यंदाचे हे सातवे वर्ष आहे.
कै. अजय थोरवे हे व्याहळी कॉलनी गावातील सर्वांच्या मनात घर करून राहिलेले, शांत, मनमिळावू व समाजकार्याची जाणीव असलेले तरुण होते.

सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असायचा. त्यांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी मोरया रे ग्रुप व मित्रपरिवाराने रक्तदान शिबिरासारखा स्तुत्य उपक्रम सुरू केला आणि तो सातत्याने यशस्वीरित्या राबवित आहेत. सदर रक्तदान शिबिर शुक्रवार दि. १३ जुलै २०२५ रोजी सकाळी ०८ ते सायंकाळी ०७ वाजेपर्यंत जि. प. प्राथमिक शाळा, व्याहळी कॉलनी, ता. वाई, जि. सातारा येथे आयोजित करण्यात आले आहे. “रक्तदान हे जीवनदान आहे” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे आणि गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.
गेल्या सहा वर्षांत या शिबिराला व्याहळी कॉलनी तसेच वाई तालुक्यातील पश्चिम भागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अनेक तरुणांनी नियमित रक्तदाता म्हणून पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी जपली आहे. या उपक्रमामुळे परिसरात एकोप्याची भावना अधिक दृढ झाली आहे.
यंदाही मोठ्या संख्येने रक्तदाते सहभागी होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. प्रत्येक रक्तदात्यास प्रोत्साहनपर भेटवस्तू देण्यात येणार आहे.

व्याहळी कॉलनी तसेच वाई तालुक्यातील पश्चिम भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करून “रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान आहे” हा संदेश कृतीतून सिद्ध करावा, असे आवाहन मोरया रे ग्रुप व मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
कै. अजय थोरवे यांच्या स्मृतींना मानवंदना देत, समाजहिताचा संदेश देणारा हा उपक्रम परिसरातील सामाजिक ऐक्य व सेवाभाव अधिक बळकट करीत आहे.











