शहरातील देहविक्रय व्यवसायाचे केंद्र असलेल्या बुधवार पेठ परिसरात फरासखाना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. खबऱ्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यात देहविक्रय करणाऱ्या ११ संशयित बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार पेठेतील एका विशिष्ट इमारतीत बांगलादेशी महिलांकडून देहविक्रय करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी फरासखाना आणि खडक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे एक संयुक्त पथक तयार करण्यात आले.
या पथकाने नियोजित ठिकाणी छापा टाकून एकूण २२ महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या महिलांच्या कागदपत्रांची कसून पडताळणी केली असता, ११ महिलांकडे भारतीय नागरिकत्वाचे वैध पुरावे मिळून आले. मात्र, उर्वरित ११ महिला संशयास्पद आढळल्या. यातील ६ महिलांनी आपण मूळच्या बांगलादेशातील असल्याचे पोलिसांसमोर कबूल केले, तर ५ महिला बांगलादेशी नागरिक असल्याचे त्यांच्याकडील इतर कागदपत्रांच्या तांत्रिक तपासणीतून स्पष्ट झाले.
या प्रकरणी पोलिसांनी कठोर पाऊल उचलले असून, ज्या ठिकाणी हा बेकायदेशीर व्यवसाय सुरू होता, ते कुंटणखाना सील करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवण्यात येणार आहे. “अवैधपणे राहणाऱ्या परकीय नागरिकांविरुद्ध आणि अनैतिक व्यवसायांविरुद्ध अशा प्रकारच्या धडक कारवाया भविष्यातही सातत्याने सुरूच राहतील,” असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.












