महावितरणने जुलै २०२५ ते जानेवारी २०२६ या काळात सरासरी दरमहा ३५ पैसे प्रति युनिट इंधन अधिभार लावल्याने घरगुती ग्राहकांच्या खिशाला प्रति महिना ७ कोटी रुपयांची कात्री लागली असून, विजदेयकात ४ टक्क्यांनी वाढ झाल्याचा दावा सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी गुरुवारी निवेदनाद्वारे केला.
दरम्यान, स्मार्ट म्हणजेच टाईम ऑफ डे (टिओडी) मीटरच्या माध्यमातून वीज ग्राहकांना जुलै २०२५ ते जानेवारी २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत साडेआठ कोटी रुपयांची बचत झाल्याचा दावा महावितरणकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आला होता. मात्र, ही सवलत मिळत असली तरी, स्मार्ट मीटर सक्तीने बसविण्यात येत आहेत. ग्राहकांच्या पडणाऱ्या भुर्दंडावर महावितरणने चुप्पी साधल्याचा आरोपही वेलणकर यांनी केला.
वेलणकर म्हणाले,’महावितरणने पुण्यातील सुमारे २५ टक्के ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवल्यामुळे सात महिन्यात साडेआठ कोटी रुपये वाचल्याची घोषणा केली. म्हणजेच प्रति महिना एक कोटी रुपये. याचा अर्थ सर्वच ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवले, तर प्रत्येक महिन्याला महावितरणचे ४ कोटी रुपये या वाचले असते. स्मार्ट मीटर बसवलेल्या घरगुती ग्राहकाला सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत प्रती युनिट ८० पैसे सूट दिली जाते. मात्र, या वेळेत बहुतांश घरांमधील लोक कामावर जातात. वीजेचा वापर फारसा होत नाही. महावितरणने दिलेल्या बचतीच्या आकड्यांवरूनही हे स्पष्ट होते.’
‘पुणे विभागाचे एकूण मासिक देयक साधारण एक हजार कोटी रुपयांचे आहे. त्यातील २०० कोटी रुपयांचे देयक घरगुती ग्राहकांचे आहे, असे समजले तरीही ‘स्मार्ट मीटर’मुळे होणारी बचत केवळ २ टक्केच होते. मात्र, महावितरणने जुलै २०२५ ते जानेवारी २०२६ या काळात सरासरी दरमहा ३५ पैसे प्रति युनिट इंधन अधिभार लावला. त्यामुळे घरगुती ग्राहकांच्या खिशाला प्रति महिना ७ कोटी रुपयांची कात्री लागली. त्यांच्या देयकात ४ टक्क्यांनी वाढ झाली. स्मार्ट मीटरच्या सवलतींवर बोलणाऱ्या महावितरणने या विषयावर मात्र चुप्पी साधल्याचे दिसते,’ असा आरोपही त्यांनी केला.
‘ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवावेत, यासाठी हा बचतीच्या आकड्यांचा खेळ करण्याची काहीच गरज नव्हती. तसेही महावितरणने नेमलेले कंत्राटदार ग्राहकांना न विचारता, प्रसंगी दमदाटी करून स्मार्ट मीटर बसवत आहेत असा सार्वत्रिक अनुभव आहे,’ असेही विवेक वेलणकर यांनी नमूद केले.
महावितरणची बाजू काय ?
‘स्मार्ट मीटरच्या माध्यमातून दिलेली सवलत आणि इंधन अधिभार या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इंधन अधिभार हा सर्व ग्राहकांना लागू होता. गरजेनुसार तो बदलत असतो. स्मार्ट मीटरमुळे मिळणाऱ्या सवलतीशी त्याचा काहीही संबंध नाही. सौर उर्जेच्या माध्यमातून मिळणारी वीज ग्राहकांना दिवसा दिली जाते. ती स्मार्ट मीटरच्याच माध्यमातून मोजता येते. त्याप्रमाणे विभागातील स्मार्ट मीटर असलेल्या ग्राहकांना सवलत देण्यात येत आहे,’ असे महावितरणच्या पुणे विभागाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी सांगितले.












