नागरिक गाढ झोपेत असताना पुण्यातील हडपसर भागात एक मोठी आग लागल्याची घटना घडली. लोहिया उद्यानाजवळ रांका ज्वेलर्सच्या पाठीमागे मजूर व कामगारांच्या वस्तीत पत्र्याचे व बांबू शेड असलेल्या एकूण १९ झोपड्या पूर्णपणे आगीत भस्मसात झाल्या.
या झोपड्यांमधील सर्व घरगुती सामान व संसारोपयोगी वस्तूही जळून राख झाल्या.सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही व्यक्ती जखमी झाली नाही किंवा जीवितहानी झाली नाही. स्थानिक रहिवाशांना रात्री उशिरा आगीची माहिती मिळाली असून, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
प्राथमिक मदतीची व्यवस्थादरम्यान, आगीत बाधित झालेल्या कुटुंबांना तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून स्थानिक प्रशासनाकडून प्राथमिक मदतीची व्यवस्था करण्यात येत आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार आग अतिशय वेगाने पसरल्यामुळे अनेकांना घरातील साहित्य बाहेर काढण्यास वेळ मिळाला नाही.
अग्निशमन विभागाने घटनास्थळी पंचनामा केला असून आग लागण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किट किंवा गॅस गळतीमुळे आग लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.पोलिसांकडूनही स्वतंत्र चौकशी करण्यात येत असून नुकसानाचा अंतिम अहवाल लवकरच तयार केला जाणार आहे.












