लोहगाव आणि वाघोली परिसरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रकार वाढले आहेत. गुरुवारी (ता.१९) दुपारी दीडच्या सुमारास दादाची वस्ती येथील दत्त मंदिराजवळ दीपाली तनपुरे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले होते.
दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी (ता.२०) वाघोली रस्त्यावरील सातव वस्ती या ठिकाणी मनीषा खरमाटे या पायी जात असताना मागून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरून नेले. दरम्यान, त्याच दिवशी लोहगावमधील माळवाडी वस्ती परिसरात दुचाकीवरील चोरांनी पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी झाला.
माळवाडी आणि सातव वस्ती घटनेतील दोनही चोर एकच असल्याचा स्थानिकांचा दावा आहे. दुचाकीवरील या चोरट्यांनी लोहगाव आणि वाघोली परिसरात उच्छाद मांडला असून पोलिसांना आव्हान देत भर दुपारी पायी जाणाऱ्या महिलांना लक्ष करत आहेत. यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण असून लवकरात-लवकर या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. यासंदर्भात लोहगाव आणि वाघोली पोलिस तपास करत आहेत.












