पुणे सातारा मार्गावर खंबाटकी घाटाच्या पायथ्याला ट्रक उलटल्यानं वाहतूक कोंडी झाली आहे. घाटाच्या खाली खंडाळा ते केसर्डी पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळी साडे सात वाजल्यापासून खंडाळा घाटातून वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं वाहनांची संख्या वाढलीय. त्यातच झालेल्या अपघातामुळे वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झालीय.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, खंबाटकी घाटाच्या पायथ्याला ट्रक उलटला आहे. सकाळी सातच्या सुमारास झालेल्या अपघातानंतर वाहतूक विस्कळीत झालीय. तीन ते साडे तीन तास वाहतूकीचा खोळंबा झाला.
पुणे-सातारा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असली तरी खंबाटकी घाटात वाहतूक सुरळीत सुरू आहे.खंबाटकी घाटाच्या खालच्या बाजूला खंडाळ्यापासून केसर्डी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
ट्रक उलटल्यानं एका बाजूने वाहतूक सुरू केली आहे. यामुळे संथगतीने वाहतूक सुरू आहे. तीन तासांनी ट्रक बाजूला करण्यात आला. मात्र अजूनही वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. खंडाळा वाहतूक पोलीस आता वाहतूक सुरळीत करत आहेत.












