महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर आता महापालिकेच्या विविध विषय समित्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूकदेखील बिनविरोध होणार आहे. या समितींवर अपेक्षेप्रमाणे भाजपच्या नगरसेवकांची वर्णी लागणार आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आवश्यक ते संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षाकडून विषय समित्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यात आले नाहीत.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये १६५ जागांपैकी ११९ जागा मिळवित भारतीय जनता पक्ष पाहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने ३०, काँग्रेसने १५ तर शिवसेना (ठाकरे) पक्षाने एका जागेवर विजय मिळविला आहे. भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्याने सर्व समित्यांवर त्यांचे वर्चस्व राहणार आहे. महापौरपदी मंजुषा नागपुरे, उपमहापौर पदी परशुराम वाडेकर तर स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत श्रीनाथ भिमाले यांची बिनविरोध निवड झाली आहे.
महापालिकेच्या सहा विषय समित्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी निवडणूक येत्या शुक्रवारी २७ फेब्रुवारीला होणार आहे. यामध्ये शहर सुधारणा, विधी, महिला व बालकल्याण, क्रीडा, शिक्षण, नाव समित्यांचा समावेश आहे. प्रत्येक समितीमध्ये १३ सदस्य असून यातील १० सदस्य हे महापालिकेत सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपचे आहेत. तर दोन सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांचा तर एक सदस्य काँग्रेसचा आहे. अर्ज भरण्यासाठी सोमवारी मुदत होती. यामध्ये केवळ भाजपच्या सदस्यांनी अर्ज दाखल केल्याने २७ फेब्रुवारीला अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची नावे जाहीर करण्याची औपचारिकता पीठासीन अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना किमान दोन सदस्यांची आवश्यकता असते. उमेदवाराच्या अर्जावर सूचक आणि अनुमोदक म्हणून सही करावी लागते. मात्र विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडे केवळ दोन सदस्य प्रत्येक समितीमध्ये आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरायचा झाल्यास सूचक आणि अनुमोदक म्हणून सही करण्यासाठी काँग्रेसच्या सदस्याची मदत घ्यावी लागली असते. याच्या बदल्यात काही समित्यांसाठी काँग्रेसच्या उमेदवाराला संधी द्यावी लागली असती, त्यामुळे विरोधी पक्षाने एकही समितीत अर्ज दाखल केला नाही.
स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर विविध विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या नेमणुका केल्या जाणार आहेत. त्यासाठी ही निवडणूक होणार आहे. त्यानुसार अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवडणूक शुक्रवारी २७ फेब्रुवारी ला होणार आहे, अशी माहिती नगरसचिव योगिता भोसले यांनी दिली. विषय समित्यांच्या बैठकीत या निवडणुका होतील. यासाठी पीठासीन अधिकारी म्हणून समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंढे यांची नेमणूक विभागीय आयुक्तांनी केली आहे.












