सविंदणे (ता. शिरूर) येथील शिक्षकाला सुमारे बारा जणांच्या टोळक्याने घरातून उचलून नेत लाथाबुक्क्या व काठ्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (ता. २४) सायंकाळी घडली.घटनेच्या निषेधार्थ सविंदणे येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी बुधवारी (ता. २५) ठिय्या आंदोलन करीत पोलिसांकडे शिक्षकाला न्याय देण्याची मागणी केली.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सविंदणे येथील क्रीडा शिक्षक नितीन चव्हाण हे घरात झोपले असताना त्यांना टोळक्याने घरातून उचलून नेले व भरचौकात बेदम मारहाण केली. टोळक्यातील काहीजणांकडे काठ्या, दांडके तसेच कोयता असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.घटनेची माहिती मिळताच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत ठिय्या आंदोलन केले.
‘जोपर्यंत आमच्या शिक्षकांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही’, असा ठाम पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला. ‘आमच्या शिक्षकांना न्याय द्या’ अशा आशयाचे फलक घेऊन विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. आंदोलनात पालकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, माहिती मिळताच टाकळी हाजी पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस अंमलदार अरुण उबाळे व शंकर बल्लाळ हे घटनास्थळी दाखल झाले. विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या वाहनालाही घेराव घालत घटनेचा निषेध नोंदविला. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.












