पुणे शहराच्या हवेत धूर आणि धूलिकणांनी भर घातली आहे. त्यामुळे नागरिकांना या हवेत श्वास घेणेही कठीण झाले आहे. बांधकामामुळे निर्माण होणारी धूळ, विविध भागांत जाळला जाणारा कचरा, यांसारख्या गोष्टी प्रदूषणास कारणीभूत ठरत आहे.
आपण श्वास घेतोय त्याच हवेमुळे आपल्याला आजारपण येऊ नये म्हणून अनेक जण वैद्यकीय उपचार घेण्यापासून ते घराबाहेर कमी वेळ घालवण्यापर्यंत सर्व मार्ग अवलंबत आहेत. वाहतूक दररोज वाढत आहे आणि कचरा जाळण्याच्या घटनाही वाढत आहेत; पण आता ‘कन्स्ट्रक्शन डस्ट’ म्हणजेच बांधकामाची धूळ हा एक ‘सायलेंट किलर’ घटक ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.पुण्यातील या परिस्थितीस कारणीभूत घटक कोणते? पुणेकरांची मागणी काय? जाणून घेऊयात…
पुण्याच्या परिस्थितीने नागरिक हतबल
बावधन, वाकड, हिंजवडी व ताथवडे येथील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. केवळ बांधकाम प्रकल्पच नव्हे, तर आजूबाजूला असलेल्या रेडी-मिक्स काँक्रीट प्लँट्स यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनचे अध्यक्ष रमेश रोकडे यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितले, “तुम्ही घरात धूळ नको असेल, तर एक मिनीटही खिडकी उघडू शकत नाही.
एका निवृत्त बँक अधिकाऱ्याने सांगितले, “आमच्यापैकी अनेक जण सतत आजारी पडत आहेत. हे सर्व धूळ आणि ॲलर्जीमुळे होत आहे. आमच्या सोसायटीभोवती तीन-चार बांधकामे सुरू आहेत. मुलांना खाली खेळायला जाऊ नका, असे किती वेळा सांगणार? प्रशासन कडक कारवाई करत नाही आणि बिल्डर नियमांनुसार वागत नाहीत. त्यामुळे आम्ही दररोज आमचा जीव धोक्यात घालत आहोत.
”सिमेंट वाहून नेणारे ट्रक झाकणे किंवा साईटवरून बाहेर पडण्यापूर्वी टायर धुणे यांसारख्या साध्या नियमांचे बिल्डर्स पालन करत नसल्याबद्दल नागरिकांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे. “एकट्या बाणेर, पाषाण व बालेवाडीमध्ये १०० हून अधिक मोठे बांधकाम प्रकल्प आहेत. त्यापैकी एकही प्रकल्प केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) २०१७ च्या मार्गदर्शक तत्त्वांचे किंवा वायू (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) कायदा, १९८१ चे पालन करत नाही, असे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.
“या जागांवरून होणाऱ्या प्रदूषणामुळे रस्त्यांवर सर्वत्र धूळ आहे. पुणे महानगरपालिका (पीएमसी), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) किंवा बिल्डर यावर कोणताही उपाय शोधत नाहीत,” असे बाणेर पाषाण लिंक रोड एरिया सभेचे निमंत्रक रवींद्र सिन्हा यांचे म्हणणे आहे. सिन्हा पुढे म्हणाले, “अनेक प्रकरणांत नियम लागू करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच नियमांची माहिती नसते आणि जमिनीवर परिस्थिती सुधारण्याची राजकीय इच्छाही दिसत नाही. बिल्डर्सकडून जेमतेम १० टक्के नियमांची अंमलबजावणी केली जाते.
”पिंपरी चिंचवडमधील परिस्थिती काय?
पिंपरी चिंचवडमध्येही विशेष म्हणजे वेगाने विकसित होणाऱ्या भागात धुळीची पातळी रहिवाशांच्या चिंतेचा विषय ठरत आहे. डिसेंबर २०२५ मध्ये सीपीसीबीने नोंदवले की, महाराष्ट्रमध्ये पिंपरी चिंचवडची हवेची गुणवत्ता सर्वांत खालावलेली होती. वाकडचे रहिवासी आणि सॉफ्टवेअर इंजिनीयर अरुण पाटोळे यांनी सांगितले, “यातील बराचसा भाग हा बांधकाम साइट्सशी संबंधित आहे. तिथे धुळीवर नियंत्रण ठेवण्याचे नियम पाळले जात नाहीत. पीसीएमसीने बॅरिकेडिंग, नियमित पाणी फवारणी यांसारख्या उपायांची अंमलबजावणी केली पाहिजे.”












