कुख्यात गुंड नीलेश गायवळ टोळीशी संबंधित आणि ‘मकोका’च्या दोन गुन्ह्यांमध्ये चार महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला वारजे माळवाडी पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातून अटक केली. अमोल दत्तात्रेय लाखे (वय-२७, रा.ईटखेडा, छत्रपती संभाजीनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
लाखे हा वारजे माळवाडी आणि कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल दोन ‘मकोका’ गुन्ह्यांमध्ये फरार होता.गुन्हा घडल्यानंतर तो लपून राहत असल्याने पोलिसांना त्याचा माग काढणे कठीण झाले होते.
पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी फरार आरोपीला अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश धेंडे यांच्या तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक संजय नरळे यांना आरोपी बार्शी येथे असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून गुरुवारी (ता.२६) पहाटे बार्शी येथून त्याला ताब्यात घेतले.












