शहरातील बिबवेवाडी, आंबेगाव आणि मार्केटयार्ड परिसरात दहशत माजविणाऱ्या नऊ गुंडाना दोन वर्षांसाठी शहर, तसेच जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिले.एकाच वेळी नऊ जणांना तडीपार करण्यात आल्याने सराइतांना जरब बसली आहे.
जालिंदर मसा मोरे (वय ४८, रा. अप्पर इंदिरानगर), अण्णा ऊर्फ गणराज सुनिल ठाकर (वय २६, रा. अप्पर बिबवेवाडी), ओंकार लक्ष्मण सणस (वय २३, रा. बिबवेवाडी), राजु महादेव डेंगळे (वय २२, रा. सुखसागर नगर), आकाश गुलाबराव कांबळे (वय २१, रा.), कृष्णा बबन लोखंडे (वय २४, रा.), आर्यन बापु बेलदरे (वय २४, रा. आंबेगाव बुद्रुक), सोमगौडा गुरन्ना चौधरी (वय ३३, रा. मार्केटयार्ड), साहिल भिमा अष्टगे (वय २०, रा. मार्केटयार्ड) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
शहरात वाढती गुन्हेगारी आणि टोळीयुद्धाचा बिमोड करण्यासाटी पोलिसांनी कडक पावले उचललेली आहेत.गुन्हेगारी टोळ्या, तसेच सराइतांच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाल्याने नऊ जणांना तडीपार करण्यात आले. आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे, गंभीर दुखापत करणे, धमकी देणे, मारहाण करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
वेळेवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने आणि त्यांच्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने ही कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी ही कारवाई केली.












