खडकवासला धरण येथील बॅकवॉटर परिसरात एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळल्याने खळबळ उडाली आहे. दीपक सपकाळ असे मृत तरुणाचे नाव असून तो परवा संध्याकाळपासून बेपत्ता होता.
मिळालेल्या माहितीनुसार, बॅकवॉटर परिसरात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना पाण्यावर एक मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी तत्काळ आपत्कालीन क्रमांक ११२ वर संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर हवेली आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला.
दरम्यान, दीपक सपकाळ याच्या बेपत्ता होण्याची तक्रार नांदेड सिटी पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.












