डॉ. जयवंत भुजबळ यांच्या हस्ते आमदार टिळेकरांचा सन्मान, चिंतामणी सोसायटीच्या सभासदांची मोठी उपस्थिती
पुणे : राजस सोसायटी चौक येथे माननीय योगेश (अण्णा) पुंडलिक टिळेकर (आमदार, विधान परिषद) यांची महाराष्ट्र राज्य ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उत्साहपूर्ण सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
आमदार टिळेकर यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याची बातमी समजताच परिसरातील कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर राजस सोसायटी चौक येथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान जेसीबीच्या सहाय्याने फुलांचा वर्षाव करून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.
यावेळी डॉ. जयवंत भुजबळ यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार टिळेकर यांचा सन्मान केला. त्यांनी आपल्या मनोगतात टिळेकर यांच्या कार्याची प्रशंसा करत, ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच ठाम भूमिका घेतली असल्याचे सांगितले. पुढील काळातही त्यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाला न्याय आणि विकासाच्या अधिक संधी मिळतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाला चिंतामणी निवास सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. विठ्ठल राऊत, ओबीसी सेलचे सचिव श्री. सुरेख राजे, सोसायटीचे खजिनदार मुकेश सावंत तसेच चिंतामणी सोसायटीतील इतर सभासद आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी आमदार टिळेकर यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात पार पडला. नागरिकांनी या निवडीबद्दल समाधान व्यक्त करत, ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस कामगिरी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.











