पुणे, दि. १ : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी रविवारी (दि. १) बोलाविण्यात आलेली संचालक मंडळाची बैठक ऐनवेळी तहकूब करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे ही निवड प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली.
कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी याबाबत अधिकृत माहिती देताना सांगितले की, अध्यक्ष निवडीची प्रक्रिया नियमानुसार पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची उपस्थिती आवश्यक असते. त्यांच्या अनुपस्थितीत निवडणूक घेणे शक्य नसल्याने बैठक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षपदाच्या निवडीची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.
अध्यक्षपद मागील महिन्यापासून रिक्त :
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर कारखान्याचे अध्यक्षपद रिक्त झाले आहे. त्यामुळे नव्या अध्यक्षाच्या निवडीकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा :
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार या प्रथमच संस्था प्रतिनिधी ‘ब’ वर्ग मतदारसंघातून संचालिका म्हणून निवडून आल्या आहेत. त्या बैठकीस उपस्थित होत्या. संचालक मंडळाकडून मिळालेल्या संकेतांनुसार, पुढील बैठकीत अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बैठकीतील उपस्थित मान्यवर :
या बैठकीस उपाध्यक्षा संगीता कोकरे, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, तानाजी कोकरे, योगेश जगताप, नितीन सातव तसेच छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जगताप उपस्थित होते. बैठकीदरम्यान कारखान्याच्या सध्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.











