पुण्यातील अत्यंत वर्दळीचे आणि तरुणाईचे आकर्षण केंद्र असलेल्या नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (FC रोड), जंगली महाराज रस्ता आणि डेक्कन जिमखाना परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
पदपथावर धोकादायक पद्धतीने गॅस शेगडी मांडून नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या तब्बल ४० खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या धडक कारवाईमुळे बेकायदा पथारी व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.डेक्कन, फर्ग्युसन रोड आणि कर्वे रस्ता हा भाग विद्यार्थी तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या राबता असलेला भाग आहे.
या ठिकाणी रस्त्याच्या कडेला आणि पदपथांवर वडापाव, अंडा भुर्जी, आणि चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्या मोठ्या प्रमाणात लावल्या जातात. मात्र, हे विक्रेते कोणत्याही सुरक्षा नियमांचे पालन न करता उघड्यावर गॅस शेगड्या पेटवून अन्न शिजवत असल्याचे समोर आले होते. दाट गर्दीच्या ठिकाणी सिलिंडरचा असा बेदरकार वापर मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण देऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी ही कारवाई केली.
पदपथांवरून चालणाऱ्या नागरिकांच्या अगदी जवळ या शेगड्या पेटवलेल्या असतात. गॅस गळती किंवा स्फोट झाल्यास येथे मोठी जीवितहानी होऊ शकते. “या भागात विद्यार्थी आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते. सार्वजनिक सुरक्षिततेचा विचार करता, उघड्यावर अशा प्रकारे व्यवसाय करणे बेकायदेशीर आहे,” असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
डेक्कन पोलिसांनी ४० टपरीधारकांवर गुन्हे दाखल करून त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. “पदपथांवर अतिक्रमण करून आणि धोकादायक पद्धतीने खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध ही मोहीम राबवण्यात आली आहे. यापुढेही बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध अशीच नियमित कारवाई करण्यात येईल,” असा इशारा डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी दिला आहे.












