पाचगणी प्रतिनिधी : प्रमोद रांजणे
पाचगणी, विद्या निकेतन हायस्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी शाळेचे सेक्रेटरी अथर्व बिरामणे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मराठी भाषेचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले. “मराठी ही आपली मातृभाषा असून तिचा अभिमान बाळगणे ही प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी आहे. इंग्रजीसह इतर भाषा शिकताना मराठीचा सन्मान आणि वापर कमी होता कामा नये,” असे ते म्हणाले.
तसेच विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय लावून मराठी साहित्याचा अभ्यास करावा, असेही त्यांनी आवाहन केले. मुख्याध्यापकांनीही मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी शाळेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कविता वाचन, भाषण स्पर्धा, नाट्यप्रयोग आणि लोकगीते सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम मराठी भाषेप्रती प्रेम, अभिमान आणि बांधिलकी व्यक्त करणारा ठरला.











