: निलेश भुजबळ महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ, मासूम संस्थेच्या वतीने आरोग्य संवाद हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी पुरंदर तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील आरोग्य सेवांचा मासूमच्या वतीने अभ्यास करण्यात आला याची मांडणी सोनाली सुतार यांनी केली, पुरंदर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये सामान्य नागरिकांना येणाऱ्या अडचणी, त्याचसोबत आरोग्य सुविधांच्या कमतरता अशा विविध प्रश्नांवर सर्वसामान्य महिला व पुरुष तसेच युवांनी तालुका आरोग्य अधिकारी तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केले. व त्याचबरोबर यांपैकी काही प्रश्नांवर तीन महिन्यांमध्ये काम व्हावे असे आवाहन देखील करण्यात आले.
परिंचे आरोग्य केंद्र संकेत जाधव, बेलसर आरोग्य केंद्र तुषार झुरंगे, अतिश जगताप, मोहन शिंदे, मंगल ताई मोरे, परिंचे शैलजाताई, युवा प्रतिनिधी गणेश तांबे इत्यादी नागरिकांनी आरोग्य सेवे मधील कमतरतेसंदर्भातील प्रश्न मांडले. साप, कुत्रा चावण्याची लस नसणे, स्वच्छता नसणे, स्टाफ कमी असणे, रात्रपाळीसाठी डॉक्टर उपलब्ध नसणे, बाळंतपणाची सुविधा व्यवस्थित नसणे, खोकल्याचे औषध न मिळणे, ब्लड प्रेशर आणि शुगरच्या तपासण्या वेळोवेळी न होणे, ॲम्बुलन्सची सुविधा नसणे, तरुणांसाठी लैंगिक आरोग्य शिक्षण, लैंगिक आजाराबद्दल , गर्भनिरोधकांबद्दल माहिती न मिळणे इत्यादी प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी पॅनलवर असणारे पुरंदर तालुक्याचे आरोग्य अधिकारी विक्रम काळे यांनी मांडणी केली व सर्व प्रश्नांपैकी काही प्रश्नांना लवकरात लवकर सोडवूयात याबद्दल आश्वासन दिले.
त्याचबरोबर जयश्री नलगे, रवी वाघमारे, शकुंतला भालेराव यांनी आरोग्याच्या प्रश्नांवर मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद सदस्य प्राजक्ता दुर्गाडे, हरिभाऊ लोळे यांनी आलेल्या आरोग्य प्रश्नांवर जिल्हा पातळीवर पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. *माझे गाव आरोग्य संपन्न गाव* या शासन निर्णय बद्दल माहिती सांगितली. महात्मा ज्योतिबा फुले व आयुष्यमान भारत योजना अशा अशा सरकारी योजना बद्दल माहिती दिली.
शासनाने सर्व जणांचा हजारो कोटीचा विमा उतरवलेला आहे तर त्याचा लाभ सगळ्यांनी घेतला पाहिजे त्यासाठी सरकारी दवाखान्यांमध्ये जाऊन सरकारी योजनेचा लाभ घेतला पाहिजे. सध्या आरोग्य सेवा चे जे प्रश्न आहेत ते आपण सर्वजण मिळून सोडवू शकतो. सरकारी आरोग्य सेवा जपूया आणि त्याचे संवर्धन करूया अशा पद्धतीने आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आरोग्य हक्क कार्यकर्त्या शकुंतला भालेराव यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमामध्ये पुरंदर तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत काम करणाऱ्या आरोग्य सेविका राणी पांगारे, अनिता नेवसे, आशा कार्यकर्त्या प्रियंका जगताप, रोहिणी माकर, कीर्ती भोसले, संगीता जाधव, सुनिता तांबे यांचा सन्मान देखील करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रमेश अवस्थी यांनी संविधानातील कलम २१ मधील सन्मानाने जगण्याच्या हक्कानुसार आरोग्य सेवा मिळणे हा प्रत्येकाचा हक्क आहे व ती चांगली मिळवण्यासाठी आपण सजग असावे असे सांगितले. ब्लड प्रेशर आणि शुगरचे प्रमाण घेतल्या जाणाऱ्या स्टिरॉईड औषधांमुळे वाढले आहे. यासाठी आपण सर्वांनी आहार व नियमित व्यायाम याची काळजी घेण्याची गरज आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रमेश अवस्थी प्रमुख पाहुण्या शकुंतला भालेराव, पुरंदर तालुका आरोग्य अधिकारी विक्रम काळे मासूम संस्थेच्या तालुका सहसंयोजक जयश्री नलगे, मीना शेंडकर. जिल्हा परिषद सदस्य डॉ.प्राजक्ता दुर्गाडे, हरिभाऊ लोळे, अजय इंगळे इ. उपस्थित होते. कार्यक्रमासाठी तसेच वेगवेगळ्या गावातील सरपंच, सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे स्वागत वैशाली कुंभारकर प्रास्ताविक मंगल मगर , मासूम संस्थेचा परिचय मीना शेंडकर, सूत्रसंचालन छाया मल्लाव आणि आभार कावेरी कुंभारकर यांनी मानले.












