उत्साही आणि आनंदी वातावरणात सोमवारी होळीचा सण साजरा करण्यात आला. सायंकाळी शहर आणि उपनगरांत ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीने होलिकादहन करण्यात आले, तर मंदिरांमध्ये भजन-कीर्तन, प्रवचन, व्याख्यानांसह भक्तिगीतांचे कार्यक्रम आयोजित केले होते.
काही संस्थांनी गरजू मुलांना पुरणपोळीचे वाटप केले, तर काही ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबविले. भाविकांनी मंदिरांमध्ये दर्शन घेत आयुष्यात सुख-समृद्धी आणि मांगल्याची कामना केली.
गुलटेकडी येथील एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. इंदिरानगर येथील वसाहतीमध्ये कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांकडून पुरणपोळी गोळा करून त्या गरजू मुलांना वाटल्या. अन्न वाया जाऊ नये, यासाठी हा उपक्रम पुणे-सातारा रस्त्यावर राबविण्यात आला. पदपथावर राहणाऱ्या गरजू मुलांना पुरळपोळी वाटप करून सण साजरा करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश शेरला यांनी संयोजन केले. उपक्रमाचे यंदाचे दहावे वर्ष होते. समृद्धी शेरला, लावण्या अरकल, ज्योती कांबळे, अलका जाधव, अश्विनी साठे, कोमल शिंदे, कोमल साळुंखे यांनी घरोघरी जाऊन पुरणपोळ्या गोळ्या केल्या. सुमारे 900 पुरणपोळ्यांचे वाटप करण्यात आले. संतोष डिंबळे, बाळासाहेब शेलार, रोहित कोंडाळ, नजीर शेख, जावेद शेख आदी उपस्थित होते.












