वाई प्रतिनिधी प्रशांत थोरवे
वाई : रोहिडेश्वर शिक्षण संस्था संचलित कमंडलू पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय, आसरे (ता. वाई) येथे “एक हात मदतीचा” या सामाजिक उपक्रमांतर्गत शालेय स्पोर्ट्स ड्रेस व भगवद्गीता ग्रंथ वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात वाई तालुक्यातील प्रख्यात वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. महेश मेणबुदले (एम.डी.) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच लहान वयात अध्यात्माची आवड निर्माण झाली तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर चांगले संस्कार होतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. विश्वरूप वारकरी शिक्षण संस्था, रेणावळेचे संस्थापक ह.भ.प. सुहास गवळी यांच्या वतीने विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना भगवद्गीता ग्रंथ देण्यात आल्याबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी डॉ. मेणबुदले यांनी आपल्या वडील कै. दत्तात्रय पांडुरंग मेणबुदले यांच्या स्मरणार्थ ५५५५ रुपयांची देणगी जाहीर केली तसेच विद्यालयातील तीन विद्यार्थी दत्तक घेण्याचा संकल्प व्यक्त केला. एलआयसी शाखा वाईचे विकास अधिकारी सिद्धार्थ पाटील यांनी मुख्याध्यापक जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकवृंद व विद्यालयाचे कर्मचारी संतोष डगळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या “एक हात मदतीचा” तसेच विद्यार्थी दत्तक पालक योजनेचे कौतुक केले.
त्यांनीही एक विद्यार्थी दत्तक घेण्याची घोषणा केली. दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी विकास जाधव यांनी अशा उपक्रमांमुळे गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मोठा आधार मिळतो असे सांगत एक विद्यार्थी दत्तक घेतला. सामाजिक कार्यकर्ते डॉ. रमेश तायडे यांनीही विविध माध्यमातून विद्यालयाला मदत करण्याचे आश्वासन दिले. सर्वोदय सेवा ट्रस्ट वाईचे संचालक विशाल सणस यांनी एक विद्यार्थी दत्तक घेऊन प्रथम वर्षासाठी ४००० रुपयांची रक्कम जमा केली. तसेच निलेश पवार (माजी चेअरमन, धोम विकास सेवा सोसायटी) व भिकू दादा सणस (सदस्य, ग्रामपंचायत रेणावळे) यांनी प्रत्येकी एक विद्यार्थी दत्तक घेण्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे “एक हात मदतीचा” या उपक्रमातून यापूर्वीही अनेक दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे.
वाई तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अशी शैक्षणिक मदत मोलाची ठरत असून या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ मिळत आहे. त्यामुळे समाजातील विविध स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. कार्यक्रमास बाबुराव चोरट, नितीन शेलार, नारायण दादा सणस, राजाराम कोंढाळकर, बाबुराव खंडू सणस, आनंदा कांबळे, अशोक बाजीराव सणस, सुरेश वाघ, शिवाजी पिसाळ, अनिल पवार, तुषार सणस, साहेबराव सणस, सुभाष वैराट, वसंत गाडेकर, सदाशिव सणस यांसह अनेक ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर सय्यद यांनी केले. प्रास्ताविक प्रकाश जाधव यांनी केले तर संतोष डगळे यांनी आभार मानले.











