शहरातील नामांकित ‘कॅफे पीटर’ या हॉटेल ब्रँडच्या व्यवसायात भागीदारी आणि आर्थिक व्यवहारावरून सुमारे २ कोटी ४ लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात कॅफे पीटरच्या ब्रँड संचालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार, चॅन सिओक जंग ऊर्फ पीटर जंग (मूळ रा. दक्षिण कोरिया, सध्या रा. वडगाव शेरी) आणि कमलेश मारुती काळे (वय ३८, रा. औंध) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी श्वेता सचिन साळुंखे (वय ३५, रा. विशालनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी श्वेता साळुंखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी कॅफे पीटर ब्रँडच्या विस्तारासाठी आणि व्यवसायासाठी फिर्यादींकडून मोठी रक्कम घेतली होती. मात्र, ठरलेल्या करारानुसार परतावा न देता आणि ब्रँड व्यवहारात अनियमितता करून फिर्यादींची २ कोटी ४ लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक केली.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर साळुंखे यांनी पोलिसांकडे धाव घेतली.बंडगार्डन पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१६(२) (विश्वासाचा फौजदारी भंग), ३१८(४) (फसवणूक) आणि ३(५) (समान हेतूने केलेले कृत्य) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. दक्षिण कोरियन नागरिक या गुन्ह्यात मुख्य आरोपी असल्याने या प्रकरणाला गांभीर्य प्राप्त झाले आहे.
पुण्यातील हॉटेल उद्योगात ‘कॅफे पीटर’चा मोठा विस्तार असून, ब्रँडच्या मुख्य संचालकावरच फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने व्यावसायिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. पोलीस आता या व्यवहारातील आर्थिक कागदपत्रांची तपासणी करत आहेत.












