समाज माध्यमावर आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करून दोन समाजात तेढ निर्माण करणार्या व्यक्ती विरूध्द दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दौंड पोलिसांनी या बाबत माहिती दिली.
जब्बार बाबूलाल शेख ( वय ६२ , रा.महात्मा गांधी चौकाजवळ, दौंड ) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.दौंड शहरात ४ मार्च जब्बार शेख याने एका ग्रुप मध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केला होता.
जब्बार शेख याच्या या कृत्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता दौंड पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १२७ अन्वये कारवाई करिता प्रस्ताव तयार केला.
बारामती विभागाचे अपर पोलिस अधीक्षक तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी गणेश बिरादार यांच्यासमोर दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक गोपाळ पवार यांनी हा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावावर ४ मार्च रोजी बारामती येथे सुनावणी घेण्यात आली.
जब्बार शेख यास १५ दिवसांकरिता येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्याचे आदेश देण्यात आले. दौंड पोलिसांनी जब्बार शेख याचा मोबाईल संच जप्त केला आहे.












