येथील मेघमल्हार संगीत विद्यालयाच्या वतीने आयोजित विशेष सांगीतिक सोहळ्यात केरळचे प्रथितयश तबलावादक अर्जुन कालीप्रसाद यांचे एकल तबला वादन झाले. त्यांना सौरभ क्षीरसागर यांनी केलेली संवादिनी साथ रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरली.
प्रख्यात तबलावादक पंडित उमेश मोघे आणि ज्येष्ठ ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
यावेळी भजनसम्राट दत्तात्रेय फडतरे, लोककलावंत दशरथ लाखे, सूत्रसंचालक नितीन राऊत, राजेंद्र मोरे आणि व्हायोलिन वादक निलिमा खंडागळे यांना कलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी गांधर्व महाविद्यालयाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. विद्यालयाचे संस्थापक अमोल बेलसरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सासवडमधील संगीतप्रेमींनी कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती.












