प्रजासत्ताक दिन परेडमधील यशात योगदान; वाईच्या अमरीन इनामदारचा साताऱ्यात सन्मान
वाई प्रतिनिधी : प्रशांत थोरवे
वाई : नवी दिल्ली येथे 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर पार पडलेल्या भव्य संचलन सोहळ्यात महाराष्ट्र शासनाच्या ‘श्री गणेश – आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या चित्ररथाने देशात प्रथम क्रमांक पटकावून राज्याचा मान उंचावला. या चित्ररथाच्या सादरीकरणात वाई शहरातील कुमारी अमरीन आजीम इनामदार हिचेही मोलाचे योगदान राहिले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत जागतिक महिला दिनानिमित्त (दि. 8 मार्च) सातारा येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य अंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, सातारा यांच्या वतीने तिचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. नवी दिल्ली येथे पार पडणारी प्रजासत्ताक दिनाची परेड ही देशातील सर्वात प्रतिष्ठेची आणि लक्षवेधी घटना मानली जाते.

विविध राज्ये आपल्या संस्कृती, परंपरा व प्रगतीचे दर्शन घडविण्यासाठी आकर्षक चित्ररथ सादर करतात. यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या ‘श्री गणेश – आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथाने अत्यंत प्रभावी सादरीकरण करत परीक्षक आणि उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. या उत्कृष्ट सादरीकरणाला देशात प्रथम क्रमांक मिळाल्याने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. या चित्ररथाच्या सादरीकरणात अमरीन इनामदार हिने आपली कला, मेहनत आणि समर्पण यांद्वारे मोलाचे योगदान दिले.

तिच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महिला दिनाच्या निमित्ताने सातारा येथे तिचा गौरव करण्यात आला. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, सातारा सुनिल जाधव यांच्या हस्ते तिला सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. अमरीनच्या या नेत्रदीपक यशाचे कौतुक यापूर्वीही अनेक मान्यवरांनी केले आहे. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले तसेच सातारा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्तेही तिचा गौरव करण्यात आला असून तिच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अमरीनच्या कार्याचे अभिनंदन करत तिच्या जिद्द, मेहनत आणि कलेचे कौतुक केले.

ग्रामीण भागातील मुलींनी विविध क्षेत्रात पुढे येऊन आपले कर्तृत्व सिद्ध करावे, यासाठी अमरीनचे यश प्रेरणादायी ठरेल, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. या सत्कार समारंभाला अमरीन इनामदार हिचे वडील अजीम इनामदार हे देखील उपस्थित होते. आपल्या मुलीच्या या यशाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करत तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अमरीन इनामदार हिच्या या यशामुळे वाई शहरासह सातारा जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल झाले असून तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महिला दिनाच्या निमित्ताने झालेला हा गौरव वाई शहरासाठी अभिमानाची बाब ठरत आहे.












