आदिवासी ठाकर बांधवावर दुःखाचा डोंगरगोनवडी-पिंपरी खुर्द (ता. खेड) येथील आदिवासी ठाकर समाजाची वस्ती असणाऱ्या भांगरे वस्तीवर चार घरांना अचानक लागलेल्या आगीत ही घरे संपूर्ण जळून राख झाली आहेत. अंगावरच्या कपड्यांव्यतिरिक्त या कुटुंबाकडे काहीही शिल्लक राहिलेले नाही.अशी दुर्दैवी वेळ या आदिवासी ठाकर बांधवांवर आली आहे.
सुदैवाने या घरातील लोक कामासाठी बाहेर असल्याने यात जीवितहानी घडली नाही.गावातील नागरिकांनी तात्काळ मदत म्हणून वर्गणी काढत २५ हजार रुपये रोख आणि काही किराणा स्वरूपात मदत या कुटुंबांना केली आहे. राजाराम दादाभाऊ भांगरे,संतोष बाळू भांगरे,अनिल राजाराम भांगरे आणि अर्जुन राजाराम भांगरे यांची कच्च्या स्वरूपात असणारी घरे या आगीत पूर्णपणे जळून राख झाली आहेत.
आज (दि. ०९) चुलीतील विस्तवामुळे ही आग लागली असून, या आगीमध्ये या चारही कुटुंबातील अन्नधान्य, कपडे, कागदपत्रे, भांडी, साठवून ठेवलेले धान्य हे पूर्णतः जळून खाक झाले आहे. याशिवाय शिलाई मशीन, एक दुचाकी आणि एक सायकल यांचे देखील या आगीत नुकसान झाले आहे. याशिवाय ४० कोंबड्यांसह त्यांची पिल्ले,तांदळाचे जवळपास ४७ कट्टे, बाजरीचे ६३ कट्टे असे देखील नुकसान या आगीत झाले आहे.
ग्राम महसूल अधिकारी मनोज जाधव, ग्रामपंचायत अधिकारी सारिका आगरकर, माजी सरपंच सचिन काळे, धनंजय तनपुरे, प्रशांत काळे आदींनी तात्काळ जागेवर जात पाहणी केली आणि या अपघातग्रस्त कुटुंबांना आर्थिक स्वरूपामध्ये मदत केली. तसेच गावातील अन्य गावकऱ्यांनी मिळून देखील अन्नधान्य स्वरूपात या कुटुंबाला मदत केली.
आर्थिक मदतीची गरज -ही चारही आदिवासी कुटुंब कच्च्या स्वरूपाच्या घरात राहत होती. त्यांची परिस्थिती हलाकीची होती. दिवसभर काम करणं आणि त्याच्यावरच आपला उदरनिर्वाह करणे अशी या कुटुंबाची बेताची परिस्थिती होती.
परंतु आज लागलेल्या आगीत या कुटुंबाचे संपूर्ण साहित्य जळून गेल्याने ही कुटुंब रस्त्यावर आली आहे. त्यामुळे सध्या या कुटुंबाला आर्थिक तसेच वस्तू स्वरूपात मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे नागरिकांनी या कुटुंबाला मदत करावी अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.












