पुण्यात गोरक्षकांच्या नावाखाली एका ट्रक चालक तरुणाला अमानुष मारहाण करून त्याला चक्क शेण खाऊ घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे.संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, म्हशीची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला थांबवून त्याच्यावर धार्मिक टीकाटिप्पणी करीत चालकाला शेण खाऊ घातल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल केल्याची घटना ६ मार्चला आंबेगाव परिसरात घडली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दखल घेवून गुन्हा दाखल केला आहे. बिपाशा ऊर्फ आकाश राजू माणिकम (रा. गुरूनानक कॉलनी, कात्रज) हेमंत गायकवाड (रा. आंबेगाव) विराज सोले यांच्याविरुद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार गणेश शेंडे यांनी फिर्याद दाखल केली आहे.
म्हशी घेऊन वाहनचालक जात असताना आरोपींनी त्याला ६ मार्चला पहाटेच्या सुमारास अडविले. त्यानंतर पोलीस मार्शलच्या मदतीने त्याला ठाण्यात आणले होते. याप्रकरणी म्हैस वाहतूक आणि ट्रकचालकाला मारहाण अशा दोन अदखलपात्र नोंद करण्यात आली होती.
दरम्यान, पोलीस अंमलदार शेंडे यांना इन्स्टाग्रामवर व्हिडीओ दिसून आला. त्यामध्ये आरोपी बिपाशा ऊर्फ आकाश, हेमंत, विराज यांनी ट्रकचालकाला जातीवाचक शिवीगाळ केली. आरोर्पीनी चालकाला शेण खाऊ घातले. धार्मिक टिप्पणी करीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आंबेगाव पोलीस तपास करीत आहेत.












