बेकायदेशीरपणे गांजा विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी एमआयडीसी भोसरी आणि चाकण परिसरात दोन कारवाया केल्या. यामध्ये ८० हजार ५० रुपये किमतीचा एक किलो ६०२ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
एमआयडीसी भोसरी पोलिसांनी रविवारी दुपारी कारवाई करत विशाल दिलीप साळवे (१९, बालाजीनगर, एमआयडीसी भोसरी) याला अटक केली. विशाल याने त्याच्या दुचाकीमधून गांजाची विक्रीसाठी वाहतूक केली. त्याच्या ताब्यातून एक किलो ३५२ ग्रॅम वजनाचा ६७ हजार ६०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गजानन आढे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.दुसरी कारवाई रविवारी सायंकाळी नाणेकरवाडी चाकण येथे करण्यात आली. यामध्ये एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास नाणेकरवाडी येथील जांभूळकर वस्ती परिसरातून आरोपी महिलेच्या ताब्यातील निळ्या रंगाच्या कॅरीबॅगमध्ये सुमारे २५० ग्रॅम वजनाचा १२ हजार ७५० रुपये किमतीचा गांजा आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल माटे यांनी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.












