वाघोलीतील जगताप वस्ती परिसरातील फर्निचर कारखान्याला आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये कारखाना पूर्ण जळून खाक झाला. पी एम आर डी ए व महापालिका अग्निशमन दलाच्या ७ ते ८ गाड्यांना आग नियंत्रणात आणण्यास सहा ते सात तास लागले.यामध्ये कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले.
रॅडियन्स किचन ॲन्ड फर्निचर असे कारखान्याचे नाव होते. गुरुवार असल्याने कारखाना बंद होता. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कारखान्याजवळ धूर दिसून आला. प्रथम कचरा जळाल्याचे येथील काही जणांना वाटले. नंतर कारखान्यातून धूर येत असल्याचे लक्षात आल्यावर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
मोठा कारखाना असल्याने व आत इम्पोर्टेड फर्निचर माल असल्याने महापालिका अग्निशमन दलाच्या गाड्याही आल्या. शटर तोडून आग विझविण्यास सुरुवात झाली. मात्र पूर्ण कारखान्यात आग असल्याने अग्निशमन कर्मचाऱ्यांना आत जाणे शक्य नव्हते. शटर, खिडकी याद्वारे तीन बाजूनी आग नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू झाले.
कारखान्याची भिंत, खिडकीचे ग्रील ही काही ठिकाणी तोडण्यात आले. सात ते आठ वाहने पाच ते सहा तास शर्थीचे प्रयत्न करीत होते. यानंतर आग आटोक्यात आली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे कारणही कळू शकले नाही.
कारखाना मालकांना रडू कोसळले
आठ वर्षापासून या परिसरात हा कारखाना होता. यामध्ये सुमारे २०० कामगार काम करीत होते. या कारखान्यात इम्पोर्टेड फर्निचर बनविले जात होते. आगीत संपूर्ण कारखाना खाक होताना पाहताना कारखान्याच्या मालकाना अश्रू अनावर झाले. गळ्यात गळा टाकून त्यांनी अश्रूला वाट काढून दिली.












