पुणे प्रतिनिधी :
नुकत्याच पार पडलेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकांमध्ये शहरातील विविध प्रभागांतून जनतेने आपला प्रतिनिधी निवडत लोकशाहीचा उत्सव साजरा केला. या निवडणुकांनंतर प्रभाग क्रमांक ३७ व ३८ मधील नवनिर्वाचित नगरसेवकांचा जाहीर सत्कार सोहळा दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी इच्छा पूर्ती गणेश दत्त प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आला. हा सत्कार सोहळा म. श्री. आमदार भीमराव आणा तपकीर साहेब यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास इच्छापूर्ती गणेश दत्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब थोरात साहेब, मा. श्री. रामचंद्र जाधव, मा. श्री.एडवोकेट सचिन साळुंखे , मा. श्री. प्रवीण गिरमे व प्रतिष्ठानचे सर्व संचालक, तसेच इच्छापूर्ती जेष्ठ नागरिक संघाचे सर्व संचालक मंडळ व सभासद यांची प्रमुख उपस्थिती लाभली. परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते. सत्कारमूर्तींमध्ये प्रभाग क्रमांक ३७ मधील नवनिर्वाचित नगरसेविका सौ. वर्षाताई विलास तपकीर तसेच सौ प्रतिभा रोहिदास चोरघे प्रभाग क्रमांक ३८ मधील सौ. सीमा युवराज बेलदरे, सौ. स्मिता सुधीर कोंढरे आणि यांचा समावेश होता. याचबरोबर प्रभाग क्रमांक ३७ मधून निवडून आलेले श्री. बाळासाहेब धनकवडे, श्री. संदीप बाळासाहेब बेलदरे आणि श्री. अरुण भगवान राजवाडे या नगरसेवकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. सत्कारप्रसंगी आमदार भीमराव आणा तपकीर यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना मार्गदर्शन करताना जनतेने दिलेल्या विश्वासाला पात्र ठरणारे कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच कार्पोरेशन मध्ये आपल्या प्रभागासाठी एकत्र मिळून आवाज उठवून या भागातील ट्राफिकचा प्रश्न,स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण व आरोग्य यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. लोकसहभागातून विकास साधल्यास प्रभागांचा सर्वांगीण विकास निश्चित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.











