पुणे, दि. १३ मार्च २०२६ — भारत सरकारच्या जनगणना संचालनालयाच्या वतीने होणाऱ्या भारताची जनगणना २०२७ या महत्वाच्या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्याच्या कामकाजाची तयारी पुणे महानगरपालिकेत सुरू झाली आहे. या अनुषंगाने पुणे महानगरपालिका हद्दीतील १५ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत घरांची यादी व घरगणना (House Listing and Housing Census) हे काम १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पाडण्यात येणार आहे.या कामकाजाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी भारत सरकारच्या जनगणना विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुणे महानगरपालिकेस भेट दिली.
यामध्ये दिल्ली येथील भारताचे रजिस्ट्रार जनरल तथा जनगणना आयुक्त कार्यालयातील डेप्युटी रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया मा. श्री. एन. राजीव, तसेच जनगणना कार्य संचालनालय मुंबई, महाराष्ट्र येथील मा. श्री. वाय. एस. पाटील (डेप्युटी रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया) आणि श्री. आर. एम. भोसले (जॉइंट डायरेक्टर) यांनी उपस्थित राहून तयारीचा आढावा घेतला.
या बैठकीस पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) मा. श्री. ओमप्रकाश दिवटे तसेच शहर जनगणना अधिकारी व उप आयुक्त मा. श्री. विजय लांडगे यांच्यासह १५ चार्ज अधिकारी उपस्थित होते.यावेळी मा. श्री. एन. राजीव यांनी पुणे महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेतला.
त्यांनी सांगितले की, नागरिकांसाठी १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्वयंगणना (Self Enumeration) करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. या प्रक्रियेद्वारे नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाइन स्वरूपात नोंदवता येणार आहे. त्यानंतर १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत महानगरपालिकेमार्फत जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचे प्रत्यक्ष कामकाज करण्यात येणार आहे.बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांनी जनगणना कामकाजाबाबत आवश्यक मार्गदर्शन करत विविध महत्त्वाच्या सूचना दिल्या.
तसेच पुणे महानगरपालिकेने केलेली जनगणनेची तयारी आणि मॅपिंगचे काम समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.या जनगणना प्रक्रियेमुळे शहरातील घरांची संख्या, रहिवाशांची माहिती आणि मूलभूत सुविधांची स्थिती याबाबत अचूक माहिती मिळणार असून, भविष्यातील विकास आराखड्यासाठीही ही माहिती उपयुक्त ठरणार आहे.












