पवना नदीचे प्रदूषण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. रावेत बंधारा, मामुर्डी आणि किवळे परिसरातील सुमारे ३५ सोसायट्यांमधील मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) बंद असल्याने तेथील मैलापाणी, सांडपाणी विनाप्रक्रिया नाल्यांवाटे थेट नदीपात्रात सोडले जात असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.
त्यामुळे तिची दखल घेऊन पाणी नमुने तपासणीसाठी पाठवले जातील. आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येतील, असे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने स्पष्ट केले आहे.पवना नदी ही शहराच्या पाणी पुरवठ्याची जीवनवाहिनी मानली जाते. रावेत येथील प्रभाग क्र.१६ मध्ये महानगरपालिकेचा २० एमएलडी क्षमतेचा मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) असून तो सुरळीत सुरू आहे. तेथे मैलामिश्रित पाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध झालेले पाणी पवना नदीत सोडले जाते.
मात्र, आजूबाजूच्या सोसायट्यांमधून थेट नाल्यांत सोडण्यात येणाऱ्या मैलापाणी, सांडपाण्यामुळे नदीतील पाण्याची गुणवत्ता घसरत असून पर्यावरणाबरोबरच नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. याच नदीतील पाणी शुद्ध करून पिंपरी चिंचवडकरांना पिण्यासाठी पुरवले जाते. त्यामुळे ही बाब अधिक गंभीर मानली जात आहे.
फक्त पावसाळ्यातच पाणी
नाल्यांमध्ये पाणी प्रत्यक्षात केवळ पावसाळ्यात नैसर्गिकरीत्या वाहते. मात्र, अनेक ठिकाणचे नाले बाराही महिने वाहताना दिसतात. मात्र इतर महिन्यांत नाल्यांत सांडपाणी, घरगुती मैला, व्यावसायिक वापरातील दूषित पाणी किंवा औद्योगिक सांडपाण्याचा समावेश असण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत त्यातून दुर्गंधी, अस्वच्छता व आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
नागरिकांच्या मागण्या
– नदी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने तपासणी मोहीम राबवावी
– बंद एसटीपी प्रकल्प त्वरीत सुरू करावेत, दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई करावी
– भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात
प्रक्रिया का आवश्यक ?
– जलप्रदूषणाची समस्या गंभीर बनू शकते
– दूषित पाण्यामुळे नदीतील जैवविविधतेवर परिणाम
– पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची गुणवत्ता खालावते
– जलजन्य आजारांचा धोका वाढतो
नालेसफाईची कामे सुरू आहे. काही ठिकाणी चेंबर खराब आहेत. काही ठिकाणी नागरिकांनी ते फोडलेले आहे. प्रभाग क्र.१६ मध्ये सर्व नाल्यांची सफाई जेसीबीच्या सहाय्याने केली जात आहे. लवकरच सर्व नाल्यांची सफाई पूर्ण होईल.












