प्रवासीमुंबई लोकल म्हणजे फक्त प्रवास करायला नाही, तर दररोज घडणाऱ्या भन्नाट घटनांचं ठिकाण आहे. कधी भांडण, कधी मैत्री, तर कधी असं काही घडतं की प्रवासीही हसून हसून थकतात. असाच एक मजेशीर पण विचार करायला लावणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.विनातिकीट प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने टीटीईला दिलेली “धमकी” ऐकून सगळेच अवाक झाले आणि हसूही आलं.
हा व्हायरल व्हिडीओ मुंबईच्या लोकल ट्रेनमधला आहे. एका महिला टीटीईने चालत्या लोकलमध्ये तिकीट तपासणी करत असताना एका प्रवाशाला विनातिकीट पकडलं. नियमाप्रमाणे त्याला दंड भरायला सांगितला. पण, दंड भरल्यानंतर जे घडलं ते कुणालाच अपेक्षित नव्हतं.व्हिडीओमध्ये दिसतं की, महिला टीटीई त्या प्रवाशाकडून २६५ रुपयांचा दंड वसूल करते आणि पावती फाडते.
सगळं एकदम शांतपणे सुरू असतं. पण, अचानक तो प्रवासी बोलायला लागतो. तो म्हणतो, “तुम्ही आज दंड घेतलात, आता मी पुढचा महिनाभर असाच विनातिकीट प्रवास करणार!” हे वाक्य ऐकताच टीटीईला हसू आवरत नाही. आसपासचे प्रवासीही एकमेकांकडे पाहून हसायला लागतात. ही धमकी म्हणावी की विनोद हेच कळत नाही. त्या प्रवाशाचा आत्मविश्वास आणि बोलण्याची पद्धत पाहून वातावरण हलकंफुलकं होतं. हा सगळा प्रकार इन्स्टाग्रामवरील arbaaz_ansarii या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.
हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जण म्हणत आहेत, “मुंबई लोकलमध्येच असे कलाकार सापडतात.” तर काहींनी टीटीईच्या संयमाचं कौतुक केलं आहे. काही लोक मात्र गंभीर मुद्दा मांडत आहेत. ते म्हणतात, “हसण्याचा विषय असला तरी विनातिकीट प्रवास ही मोठी समस्या आहे.” तर काही प्रतिक्रियांमध्ये असंही म्हटलंय की, “दंड कमी असल्यामुळेच लोक घाबरत नाहीत.
”भारतीय रेल्वेच्या नियमानुसार, मुंबई लोकलमध्ये विनातिकीट पकडल्यास कमाल २५० रुपये दंड आणि प्रवास केलेल्या अंतराचं पूर्ण तिकीट भाडं भरावं लागतं, त्यामुळे एकूण रक्कम साधारण २६५ रुपयांपर्यंत जाते. काही गंभीर प्रकरणात अधिक दंड किंवा शिक्षेचीही तरतूद आहे. हा व्हिडीओ जरी मजेशीर असला, तरी तो एक वास्तव दाखवतो. कायद्याची माहिती असूनही काही लोक सहजपणे नियम मोडतात.












