पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दहिवडी गावात १२ वर्षीय शाळकरी मुलाची धक्कादायक हत्या झाल्याची घटना घडली आहे. साईराज गणेश मांजरे (वय १२, सहावी इयत्ता) या विद्यार्थ्याचा मृतदेह घराजवळील विहिरीजवळ अर्धनग्न अवस्थेत आढळून आला.
या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी भावकीतील एका तरुणाला संशयित म्हणून ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, साईराज शाळेतून घरी आल्यानंतर कपडे बदलून खेळायला गेला होता.
सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास मांजरेवस्ती परिसरातील विहिरीजवळ त्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला. मृतदेहावर जखमा आढळून आल्याने हत्येचा संशय व्यक्त होत आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात दाखल करण्यात आला असून, पोस्टमॉर्टम अहवालाची प्रतीक्षा आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात समलिंगी संबंधाला विरोध केल्यामुळे ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. संशयित तरुण भावकीतील असून, त्याच्याकडून अधिक माहिती घेण्यात येत आहे. या घटनेमुळे दहिवडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.












