कात्रज : दत्तात्रय कांबळे
पुणे शहरातील आंबेगाव परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चार वाहनांना धडक दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही घटना दिनांक २१ मार्च २०२६ रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बेंगळुरू-मुंबई महामार्गावरील दरी पुलाजवळ घडली. फिर्यादी लंकेश हरिश्चंद्र निकम हे त्यांची महिंद्रा बुलेरो पिकअप गाडी घेऊन जात असताना, रस्त्यावर असलेल्या गतीरोधकामुळे त्यांनी गाडीचा वेग कमी केला.

याच वेळी मागून येणाऱ्या अशोक लेलँड ट्रकने भरधाव वेगात त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. एवढ्यावरच न थांबता ट्रकने पुढील इतर दोन वाहनांनाही धडक दिली. या अपघातात लंकेश निकम आणि दुसऱ्या वाहनाचे चालक संदीप जाधव हे जखमी झाले.
जखमींना तातडीने उपचारासाठी सिल्वर बर्च हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रक चालक महंतेश विराप्पा गाजी याला अटक करण्यात आली आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर तसेच वाहतूक विभागाच्या अधिकारी प्रियंका गोरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील तपास सुरू केला आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले आहे.











