वारजे परिसरात कौटुंबिक वादातून आगळावेगळाच प्रकार घडला. त्यामुळे वारजे परिसरातील नागरिक मात्र हैराण झाले आहेत. झालं असं… दीड वर्षांपासून सुरू असलेल्या पती-पत्नीतील वाद थेट दुचाकी जाळण्यापर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित दाम्पत्य काही काळापासून वेगळं राहत होतं.
पत्नी माहेरी राहात असताना पतीकडून तिला पुन्हा सासरी येण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात होते. मात्र, पत्नीने परतण्यास नकार कायम ठेवला होता.या पार्श्वभूमीवर पतीने संतापाच्या भरात थेट कृती करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले. तो रात्री उशिरा पत्नी राहत असलेल्या सोसायटीत गेला. परिसराची पाहणी करून त्याने पार्किंगमध्ये उभी असलेली पत्नीची दुचाकी ओळखली. यानंतर त्याने दुचाकीवर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली.
काही वेळातच आगीने तीव्र रूप धारण करत वाहन पूर्णतः जळून गेले. अचानक लागलेल्या आगीमुळे सोसायटीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तपासाच्या आधारे पतीची ओळख पटवण्यात आली आणि त्याला अटक करण्यात आली.
या प्रकरणात संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. कौटुंबिक मतभेद वेळेत न सोडवल्यास ते किती गंभीर स्वरूप धारण करू शकतात, याचे हे पुण्यातील एक उदाहरण ठरत आहे.
दरम्यान, या घटनेची सध्या परिसरात चांगलीच चर्चा होत आहे. खरेतर पती-पत्नीचे नाते हे विश्वास, प्रेम आणि परस्परांचा सन्मान यावर अवलंबून असते. याच गोष्टी दोघांच्या संसारासाठी महत्त्वाच्या असतात. पण काही वेळेला पती-पत्नीच्या नात्यात कधी विश्वास कमी पडतो, कधी प्रेम कमी पडते तर कधी सन्मान कमी पडतो, त्यातून अशा प्रकारच्या घटना घडतात.
काही घटनांमध्ये पुरुष हे महिलांना कमी लेखतात, त्यातून त्यांच्यात वाद होता. या वादाचे गंभीर परिणाम त्यांच्या वैवाहिक जीवनावर पडतात. त्यामुळे जोडीदाराचा सन्मान ठेवणं जास्त आवश्यक आहे. तसेच कोणताही वाद असला तरी तुटेल इतकं ताणू नये असं म्हटलं जातं.
योग्यप्रकारे संयमाने संवाद ठेवून चर्चेतून वाद मिटवणे आवश्यक असते. अबोला किंवा माहेरी निघून जाण्याने दोघांच्या नात्यातील दरी जास्त वाढते. तसेच एखाद्या पतीने पत्नीला छळले असेल तर त्या महिलेने योग्य कायदेशीर मार्ग लवकर निवडणे आवश्यक असते. कारण असे पती महिलेच्या जीवासाठी धोक्याचे ठरु शकतात.












